Nanded news – पूरग्रस्तांच्या समस्या न ऐकताच पालकमंत्री अतुल सावे यांचा काढता पाय; जनतेचा आक्रोश, गाडी अडवण्याचा प्रयत्न

निजामसागर धरणाचे दरवाजे उघडल्याने मांजरा नदी काठावरील नागणी व हरनाळी या गावाला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुंडलवाडी शहरातील मंगल कार्यालयात ग्रामस्थांना स्थलांतर केले. त्यानंतर शनिवारी पालकमंत्री अतुल सावे हे पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कुंडलवाडी येथे आले होते. पण जनतेचा आक्रोश पाहून पालकमंत्री अतुल सावे यांनी पूरग्रस्तांच्या समस्या न ऐकताच काढता पाय घेतला. यामुळे संतप्त पूरग्रस्तांनी पालकमंत्र्याची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला.

कुंडलवाडी परिसरात असलेल्या नागणी व हरनाळी या गावाला पुराचा वेढा बसल्याने प्रशासनाने गावातील ४०० लोकांना शहरातील कै. के. रामलू मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केले आहे. शनिवारी पालकमंत्री अतुल सावे हे पूरग्रस्तांच्या समस्या ऐकण्यासाठी कुंडलवाडी येथे आले होते. गत दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे व मांजरा नदीपात्रातील पाण्यामुळे शेतातील पिके उध्वस्त झाली असून शेताला तलावाचे स्वरूप आल्याने पूरग्रस्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. अशातच पालकमंत्री अतुल सावे यांनी पूरग्रस्तांच्या भावना न ऐकताच अवघ्या दहा मिनिटात काढता पाय घेतला. यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संतापाचा उद्रेक झाला पूरग्रस्त नागरिकांकडून अतुल सावे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. संतप्त पूरग्रस्तांनी पालकमंत्री, आमदार व सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी यावेळी केली.

मांजरा नदीला आलेल्या पुराचा फटका नागणी व हरनाळी या दोन्ही गावाला बसला असून शेतीत पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पिकांचा चिखल झाला आहे. घरात पाणी शिरल्याने आमचे संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संसार उघड्यावर पडला आहे. तीन दिवसांनी पालकमंत्री अतुल सावे हे आमच्या भावना न ऐकता फक्त फोटोसेशन साठी आले होते का? या भागाचे आमदार जितेश अंतापूरकर हे गत तीन दिवसापासून कुठे होते? शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी आश्वासनाची खैरात केली पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला कोणतीही मदत शासन व प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही. नागणी ते हरनाळी या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेला पूल अतिशय निकृष्ट केल्याने हरनाळी गावात पाणी शिरले त्यामुळे आमच्या आमचे शेती व घराचे मोठे नुकसान झाले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त सुलोचना निदाने, अनुसयाबाई कांबळे, जयशीला धोतरे, गंगुबाई शंकर होरके, जिजाबाई धोतरे यांनी दिली आहे.

निवडणुकीत मत मागण्यापुरतेच आमदार येतात का? आमच्या समस्या कोण सोडणार? रस्त्याची बिकट परिस्थितीमुळे गरोदर महिलांना जेसीबीमध्ये न्यावे लागते एवढी भयानक परिस्थिती या भागाची असतानाही पालकमंत्री अतुल सावे व आमदार अंतापूरकर हे आमच्या समस्या न ऐकताच निघून गेले अशी संतप्त प्रतिक्रिया नागणी येथील नागनाथ गादगे यांनी दिली आहे.