Nanded news – सत्तेच्या हव्यासातून पोटच्या मुलीचा खून; 3 अपत्यांच्या अटीमुळे चिमुकलीला कॅनॉलमध्ये फेकले, निर्दयी बापाला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी

निवडणुकीत सरपंच पदाच्या निकषासाठी अडसर ठरणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता पाहून बापानेच 6 वर्षाच्या मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. अंगात हैवान संचारलेल्या निर्दयी बापाने मुलीला तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरा जवळील कॅनॉलमध्ये फेकून खून केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बोधन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून मुखेड तालुक्यातील केरूर येथून मुलीचा बाप पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेतले आहे.

मुखेड शहरातील बारहाळी चौकात वास्तव्य करणारा पांडुरंग बाबूराव कोंडामंगले (वय – 32, रा. केरुर) याने 6 वर्षांची मुलगी प्राची हिला दोन दिवसांपूर्वी दुपारी 12 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहनावर बसविले आणि पत्नीस नांदेडला जातो म्हणून तेलंगणा राज्यातील कडपल्ली येथील रस्त्यालगत असलेल्या कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर सायंकाळी मुखेड येथे एकटाच परत आला.

घटनेनंतर स्थानिकांनी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलीस बाहेर काढून पोलिसांना कळविले. यानंतर मुखेड पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत पांडुरंग कोंडामंगले यास चौकशीसाठी बोलावले. आरोपी पांडुरंग कोंडामंगले यास येडापल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन नेले, अशी माहिती पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी दिली.

दरम्यान, प्राची कोंडामंगले हिचे पार्थिव घेऊन नातेवाईक मुखेडकडे निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून निर्दयी वडिलांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्राची शाळेत होती हुशार

प्राची ही शहरातील महेश वंटेकर यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होती. ती हुशार व होतकरू विद्यार्थीनी होती, असे वंटेकर यांना सांगताना गहिवरून आले. राजकारणाच्या नादात पोटच्या पोरीचा बळी घेणाऱ्या या घटनेबाबत शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.