1 लाख 23 हजाराची बॅग पोलिसांनी तीन तासात शोधली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड येथील आपल्या मुलाच्या कृषी पदवी प्रवेशासाठी आलेल्या एका कुटुंबाचे ऑटोमध्ये विसरलेले 1 लाख 23 हजार रुपये नांदेडच्या वजिराबाद आणि वाहतूक शाखा पोलिसांनी संयुक्तपणे 3 तासाच्या आत शोधून ते सर्व पैसे मालकांना परत केले.

हरीभाऊ व्यंकट स्वामी अकोला हे राजामंद्री जि.गोदावरी (आंध्र प्रदेश) येथील रहिवाशी आहेत. हरीभाऊ आणि त्यांचे इतर चार कुटूंबिय आज दुपारी 1.30 वाजता हैद्राबादहून नांदेडला येणाऱ्या लिंक एक्सप्रेमध्ये बसून नांदेडला पोहचले. रेल्वे स्थानकाजवळ जेवण करून ते एका ऍटोने ट्रॅव्हल्स पॉईंट बाफना येथे पोहचले. ऑटोवाल्याला पैसे दिल्यानंतर तो निघून गेला. कांही वेळानंतर त्यांच्या हे लक्षात आले की, एक बॅग ऑटोमध्ये राहिली. या संदर्भाने त्यांनी त्वरीत वजिराबाद पोलीस ठाणे गाठले आणि याबद्दलची माहिती दिली.

वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्याशी संपर्क साधून एका संयुक्त मोहिमेची आखणी केली. त्यात पोलीस उपनिरिक्षक किरण पठारे, पोलीस कर्मचारी गजानन किडे, बबन बेडदे, चंद्रकांत बिरादार आणि संजय जाधव यांनी त्वरीत ऑटो शोध मोहिम राबवली. हा ऑटो क्रमांक एम.एच.26 एन. 6096 सिडको भागातील एका हॉटेलसमोर थांबलेला भेटला. ऑटो चालक बापूजी देविदास कदम यांना सुध्दा ऑटोमध्ये बॅग विसरलेली माहीत नव्हती. तपासणी केली असता ऑटोत संपूर्ण 1 लाख 23 हजार रुपये आणि इतर साहित्य तसेच होते. पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी या संदर्भाची माहिती पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके यांना दिली आणि ऑटोमध्ये विसरलेले 1 लाख 23 हजार रुपये हरीभाऊ व्यंकटस्वामी अकोला यांना परत केले.

पोलिसांनी त्वरीत घेतलेल्या मेहनतीमुळेच माझी सर्व रक्कम मला परत मिळाली असा आनंद हरीभाऊ व्यंकटस्वामी(अकोला) यांनी व्यक्त केला आहे.