विषाणूंचा संसर्ग रोखणारे नॅनो सिल्व्हर रसायन विकसित

1804

स्पर्शातून प्रसार होणाऱया विषाणूचा संसर्ग वीस मिनिटांत नष्ट करणारे आणि विषाणूविरोधी आवरण तीस वर्षे टिकणारे तंत्रज्ञान पुण्यातील टेक एक्स्पर्ट इंजिनीअरिंग या कंपनीने विकसित केले आहे. नॅनो सिल्व्हर रसायनाचा कोट वस्तूंना दिल्याने या विषाणूंची वाढ थांबते. सध्या वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहाता हे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी ठरत असून, अशा प्रकारचे हिंदुस्थानातील हे पहिलेच तंत्रज्ञान आहे.

टेक एक्स्पर्ट इंजिनीअरिंग या कंपनीचे संचालक जे. व्ही. इंगळे या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना म्हणाले, जर्मनीतील जे. बी. नौहोस या कंपनीच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, तेथील तंत्रचाचणीतून ते सिद्ध झाले आहे. नॅनो सिल्व्हर रसायन अतिशय पातळ आणि पारदर्शक असते. हे रसायन 20 ते 30 नॅनो मीटरपर्यंत बारीक केलेले असते. त्यानंतर विशिष्ट प्रक्रिया करून ते रसायन त्या वस्तूंना लावले जाते. नंतर 140 ते 180 डिग्री तापमानापर्यंत ते तापवले जाते. त्यामुळे ते रसायन त्या पृष्ठभागावर घट्ट बसले जाते. हे आवरण अतिशय कडक आणि निर्जंतुक होते. या पृष्ठभागावर कोणताही विषाणू बसला तर तो वीस मिनिटांत नष्ट होतो. तसेच, रासायनिक प्रक्रियेमुळे तो भाग अतिशय टणक झालेला असतो. त्यावर कोणत्याही टोकदार वस्तूने ओरखडे ओढले तरी ते पडू शकत नाही.

या रसायनाचा थर प्लॅस्टिक, ग्लास आणि धातू यावर देता येतो. जेथे हा रासायनिक थर दिला जातो, तो पृष्ठभाग विषाणूमुक्त होतो. हिंदुस्थानात फेब्रुवारी 2020 मध्ये हे तंत्रज्ञान आले असून, विषाणूंना रोखणारे ते देशातील पहिलेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असल्याचा दावा इंगळे यांनी केला आहे. सतत स्पर्श होणाऱया वस्तूंसाठी हे आवरण अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे स्पर्शाद्वारे पसरणाऱया विषाणूंना अटकाव होतो.

सध्या या तंत्रज्ञानाला मेडिकल, सेफ्टी गॉगल, कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी मागणी आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा वाजीव दरात ते उपलब्ध आहे. शंभर रुपयांपासून उपलब्ध होणाऱया या तंत्रज्ञानाचा खर्च वस्तूच्या आकाराप्रमाणे येतो.

नॅनो सिल्व्हर तंत्रज्ञानाचा वापर पुढील ठिकाणी गरजेचा –

बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ, बायोमेट्रिक मशीन, शाळा, महाविद्यालये, उद्यानातील मुलांची खेळणी, जीम साहित्य, हॉस्पिटल्स, स्वच्छतागृहातील नळ, मोबाईल, लाइट बटन, स्विच, डोअर बेल, डोअर हॅण्ड, हॉटेल्स, जिथे गर्दी होते अशा सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत जे. व्ही. इंगळे यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या