नारायण राणेंच्या फोटोची संभाजीनगरात खेटराने पूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात संभाजीनगरात जोरदार आंदोलन करण्यात आले. राणेंच्या फोटोला चपलांनी प्रसाद दिला. तर त्याचवेळी कोंबडीचोर हायहाय च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले होते.

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे व पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून क्रांती चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

narayan-rane-fire

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्याकडे राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली, त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, उपजिल्हा प्रमुख आनंद तांदूलवाडीकर आदींची उपस्थिती होती.