
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको म्हणत 95 टक्के लोकांनी हिंदी सक्तीला ठाम विरोध केला आहे. त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ही बाब दिसून आली आहे. समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्वतः ही माहिती दिली. 5 डिसेंबरपर्यंत समितीला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत होती. मात्र 2 डिसेंबरपर्यंत समितीचे राज्यभरात दौरे राहणार असल्याने 20 डिसेंबर रोजी अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला जोरदार विरोध झाला. याच विरोधातून राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेत त्रिभाषा समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जाधव यांनी समितीच्या प्राथमिक निष्कर्षाची माहिती दिली. ते म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील लोकांशी बोलून त्यांची मते जाणून घेत आहोत. नागपूर, नाशिक आणि रत्नागिरीला जाऊन आलो. जनमत समजून घेत आहोत. साधारणपणे 90 ते 95 टक्के लोकांना पाचवीपासून हिंदी हवी. 95 टक्के लोकांचा ठाम आग्रह आहे की हिंदी भाषा लादता कामा नये. त्यांनी पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची नको असे म्हटले आहे. अर्थात अनेकांचा त्याला वेगवेगळा युक्तिवाद आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्याशी चर्चा
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले, त्रिभाषा समितीच्या कामाबाबत राज ठाकरे समाधानी आहेत. आज त्यांना भेटून हिंदी भाषेबाबत त्यांचे मत आम्ही विचारले. त्यावेळी त्यांनी पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची भाषेची सक्ती असता कामा नये. पाचवीपासून पुढे हिंदी भाषा असली तरी चालेल, परंतु ती ऐच्छिक स्वरूपात असायला हवी. त्याला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असा आग्रह धरला. त्याबाबत आम्ही नोंद घेतली आहे, असे जाधव म्हणाले.
जास्तीत जास्त अभिप्राय नोंदवा
आमच्या त्रिभाषा धोरण समितीने पहिल्याच बैठकीत ठरवले होते. संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या भावना, जनमत काय आहे हे समजून घ्यायचे. आम्ही आठ ठिकाणी जायचे ठरवले. त्यातील तीन ठिकाणे झाली आहेत. 10 ऑक्टोबरला नागपूरला होतो, 31 ऑक्टोबरला रत्नागिरी, 1 नोव्हेंबरला कोल्हापूर येथे होतो. आता 11 नोव्हेंबरला नाशिक, 13 नोव्हेंबरला पुण्यात, त्यानंतर सोलापूर अशा विविध ठिकाणी जाऊन शेवटी मुंबईत येणार आहोत. समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी बोलून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्यासाठी आम्ही चार प्रश्नावली तयार केली आहेत. tribhashasami-ti.mahait.org अशी वेबसाईट बनवली आहे. त्यावर जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन नरेंद्र जाधव यांनी केले आहे.































































