
झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी जबरदस्त हल्ला केला आहे. आपल्या खास शैलीत त्यांची शॉटगन पुन्हा धडाडली. ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’ तुमचा खेळ खल्लास झाला आहे…खामोश झारखंड भाजपा…टाटा, बाय बाय अशा शब्दांत पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि विद्यमान काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले.
तुमच्या अपेक्षा मोठय़ा होत्या, पण आता असे वाटतेय की तुमचा खेळ संपला आहे. आता दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक ठिकाणांचा नंबर आहे, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. आज मंगळवारी ट्विट करून शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या सरयू राय यांची शत्रुघ्न यांनी प्रशंसा केली . दरम्यान, हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि जनता दलाच्या आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. आघाडीच्या वतीने प्रमुख म्हणून हेमंत सोरेन यांनी मंगळवारी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. दुसरीकडे रघुबर दास यांनी पराभव स्वीकारत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
टू मेन आर्मीच्या अहंकारामुळे सरयू यांना तिकीट मिळाले नाही
सरयू राय यांनी दास यांना केवळ आव्हान दिले नाही तर त्यांचा दणदणीत पराभवही केला. ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’च्या अहंकारामुळे सरयू यांना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांना मोठय़ा मताधिक्यांनी हरवले असेही शत्रुघ्न यांनी म्हटले आहे.
























































