
सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्रात पेटलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि ९ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मराठा संघटनांनी दिलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानीत दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन खलबते केली. दरम्यान, राज्यातील स्फोटक स्थितीबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन स्फोटक बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला होता, मात्र मराठा समाजातील असंतोष काही थांबत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांशीच चर्चा केली.
हिंसाचारावर पंतप्रधानांची नाराजी, मात्र मुख्यमंत्र्यांना गो अहेड
राज्यातील हिंसाचार आटोक्यात येत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र राज्य मंत्रिमंडळातले भाजपचेच दोन मंत्री हे आंदोलन स्फोटक बनविण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्याचे समजते. तसेच काही पोलीस अधिकाऱयांना हाताशी धरून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचेही प्रयत्न होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर, सांगली व जळगाव महापालिकेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी गो अहेड असे सांगत मुख्यमंत्र्यांना अभय दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले
‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ हे केवळ मराठा समाजासाठीच असावे. याच्या नावातील ‘मागास’ शब्द वगळून त्या जागी ‘मराठा’ हा शब्द असावा अशी मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळ हे केवळ मराठा समाजासाठीच राहील याविषयीचा अध्यादेश सरकार आठ दिवसांत काढेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती या शिष्टमंडळाने दिली.

























































