
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातील पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. त्यासाठी जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाची गरज आहे. त्यासाठी ‘स्वच्छ भारत’ सारखे जनआंदोलन उभारण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ‘मन की बात’ द्वारे पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाचे आवाहन केले. या ‘मन की बात’ मध्ये त्यांनी जलसमस्या, योग दिवस, आणीबाणी यासारख्या विषयांचा उल्लेख केला.
PM Narendra Modi: Water crisis hits many parts of the nation every year. You will be surprised that only 8% of the rain water in the whole year is harvested in our country. https://t.co/IiQsi1UCvm
— ANI (@ANI) June 30, 2019
पाण्याची समस्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन मोदी यांनी केले. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यासाठी सरकारने जलशक्ती मंत्रालय सुरू केल्याचेही ते म्हणाले. देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्याचसाठी जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, असे ते म्हणाले. निडणुकीनंतर आपण पुन्हा भेटू असे आपण म्हणालो होतो. मात्र, मी पुन्हा सत्तेत आलो नसून, तुम्ही लोकांनीच मला पुन्हा निवडून दिले आहे, असे सांगत मोदी यांनी विरोधकांना टोला हाणला. ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलाचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूक आणि प्रचारामुळे काही काळ आपली भेट झाली नाही. तो काळ आपल्यासाठी खडतर होता. मन की बात कार्यक्रमात जिवंतपणा आहे. आपलेपणा आहे. त्यात मन गुंतले आहे. म्हणूनच पुन्हा आपल्याला भेटायला आल्याचे ते म्हणाले. मन बात कार्यक्रमात मी बोलतो. ते शब्द माझे असतात. आवाज माझा असतो. मात्र कथा, पुरुषार्थ आणि पराक्रम तुमचा असतो असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये मन की बात कार्यक्रम झाला नसल्याने मला प्रत्येक रविवारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, असेही ते म्हणाले. मात्र, आजपासून पुन्हा तुमच्याशी संवाद साधत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात लादण्यात आलेली आणबाणी हा लोकशाहीवरील एक डाग आहे. आणीबाणी विरोधातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे आंदोलन चिरडले गेले नाही. जनतेने त्यांचा आक्रोश मतपेटीतून व्यक्त केला. लोकशाही वाचवण्यासाठी सामन्यांनी मोठे योगदान दिले. लोकशाहीत मूलभूत अधिकारांवर गदा येते, तेव्हा लोकशाहीची खरी शक्ती दिसून येते, असे ते म्हणाले. देशात आणबाणी लागू करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिल्याचेही मोदी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले. देशासह आंतराराष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने जनता सहभागी झाली होती. त्यांचे आभार मानत असल्याचेही मोदी म्हणाले. मन की बात चा मोदी यांचा हा 53 वा कार्यक्रम होता.






























































