‘ओम्’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहींना करंट लागतो! पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारले

‘ओम्’ आणि ‘गाय’ शब्द ऐकताच काहीजणांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना करंट लागतो अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी मथुरेचा दौरा केला. शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा करतानाच ‘प्लॅस्टिकमुक्त हिंदुस्थान’ आणि ‘जय किसान’चा नारा दिला.

‘ओम्’ आणि ‘गाय’ हे शब्द कानावर पडताच काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. देश पुन्हा 16व्या-17व्या शतकांत गेल्यासारखे त्यांना वाटते. अशा ‘ज्ञानी’ लोकांनी देशाचे वाटोळे केले आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले. ‘ग्रामीण जीवनात पशुसंवर्धन हे महत्त्वपूर्ण आहे. पशुसंवर्धनाशिवाय ग्रामीण कुटुंब कसे जगू शकेल? पशुसंवर्धनाशिवाय अर्थव्यवस्थेचा विचार होऊच शकत नाही. पण काही लोकांना ‘गाय’ हे नाव ऐकताच इलेक्ट्रिक शॉक का बसतो याचेच मला आश्चर्य वाटते’ असे पंतप्रधान म्हणाले. ‘आज संपूर्ण विश्व पर्यावरणसंरक्षणासाठी रोल मॉडेलचा शोध घेत आहे पण हिंदुस्थानकडे भगवान श्रीकृष्ण यांच्यासारखा प्रेरणास्रोत आहे’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

2 ऑक्टोबरपर्यंत आपले घर प्लॅस्टिकमुक्त करा!

2 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकाने आपले घर, कार्यालय ‘सिंगल युज’ प्लॅस्टिकमुक्त करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आज ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान सुरू झाले असून राष्ट्रीय प्राणीरोग प्रतिबंधक कार्यक्रमदेखील सुरू केल्याचे ते म्हणाले. यावेळी दुभत्या गाई-म्हशींना गंभीर आजारांपासून मुक्त करण्यासाठी तयार केलेल्या 13 हजार 500 कोटी रुपयांच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधानांनी गोसेवेने केली. यावेळी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित  महिलांची भेट घेतली. कचरा वेचून पंतप्रधानांनी लोकांना प्लॅस्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या