मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्य, मात्र आऊटफिल्डला आयसीसीकडून सर्वोत्कृष्ठ शेरा

मोदी स्टेडीयमच्या आऊटफिल्डला आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट शेरा

वन डे वर्ल्ड कपच्या फायनलला वापरण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत हिंदुस्थानी प्रशिक्षक राहुल द्रविडने नाराजी दर्शवली होती. अखेर ‘आयसीसी’नेही नरेंद्र मोदी स्टेडियमची फायनलला वापरण्यात आलेली खेळपट्टी सामान्य असल्याचे जाहीर केले, तर दुसरीकडे स्टेडियमची आऊटफिल्ड सर्वोत्कृष्ट असल्याची मोहोर खुद्द ‘आयसीसी’ सामनाधिकारी ऍण्डी पायक्रॉफ्ट यांनी उमटवली आहे. त्यामुळे एकाच स्टेडियमबाबत दोन वेगवेगळी मते जाहीर झाल्यामुळे खेळपट्टीच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण केली जात आहे.

गेल्या 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला गेला होता. हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा झालेल्या या सामन्यासाठी दुसरी खेळपट्टी वापरण्यात आली होती आणि या खेळपट्टीबाबत द्रविड याने नाराजीचा सूर दाखवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाला केवळ 240 धावाच करता आल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने विश्वविजयी लक्ष्य 43 व्या षटकांतच गाठले होते. ज्या खेळपट्टी सामना खेळला गेला ती खूप संथ होती, अशी प्रतिक्रिया खुद्द पायक्रॉफ्ट यांनी दिली.

एक नव्हे चार खेळपट्टय़ा सामान्य

‘आयसीसी’ने वर्ल्ड कपच्या काही सामन्यादरम्यान खेळपट्टय़ा सामान्य असल्याचा शेरा मारला आहे. कोलकाता, लखनौ, अहमदाबाद आणि चेन्नईत हिंदुस्थान खेळलेल्या सामन्यादरम्यान खेळपट्टय़ांचा दर्जा सामान्य असल्याचे ‘आयसीसी’ने अहवालात नमूद केले आहे.

वानखेडेच्या खेळपट्टीला चांगला दर्जा

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हिंदुस्थानी संघाच्या सूचेननुसार सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला गेला होता, अशा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र हा सामना जुन्याच खेळपट्टीवर खेळविला गेला होता आणि खेळपट्टीचा दर्जा चांगला होता, असा शेराही ‘आयसीसी’ने दिला आहे. मात्र कोलकाता, लखनऊ, अहमदाबाद आणि चेन्नईची खेळपट्टी सामान्य असल्याचे ‘आयसीसी’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्याची खेळपट्टी सामान्य दर्जाची असल्याचा शेरा ‘आयसीसी’ने आपल्या अहवालात मारला आहे. मात्र या सामन्याला सामनाधिकारी असलेल्या जवागल श्रीनाथने या आऊटफिल्डला सर्वोत्कृष्टचा दर्जा दिला आहे.