पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला ब्रेक, कारणही केलं स्पष्ट

पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी ‘मन की बात’द्वारे रविवारी देशवासियांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाद्वारे ते देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशीही चर्चा करतात आणि सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशीही संवाद साधतात. मात्र आता या कार्यक्रमाला पुढील तीन महिन्यांसाठी ब्रेक लागणार आहे. आज प्रसारित झालेल्या 110व्या भागादरम्यान मोदींनी याबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यादरम्यान मोदींनी तीन लोकांशी फोनवर चर्चाही केली आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशी संवादही साधला. यावेळी मोदींनी नैसर्गिक शेतीचेही महत्व अधोरेखित केले. रासायनीक शेतीमुळे भूमातेला त्रास होत असून तिला वाचवण्यासाठी मातृसंस्थेचे मोठे योगदान आहे. देशातील कानाकोपऱ्यातील महिला नैसर्गिक शेतीचा विस्तार करत असल्याचे ते म्हणाले.

यादरम्यान मोदींनी पुढील तीन महिने ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारित होणार नसल्याचीही माहिती दिली. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून गेल्यावेळीप्रमाणे यावेळीही मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राजकीय शिष्टाईचे पालन करून लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘मन की बात’ पुढील तीन महिने प्रसारित होणार नाही. पुढचा भाग 111 वा असेल. यापेक्षा शुभ आणखी काय असेल? असे मोदी म्हणाले.