एकाच कुटुंबातील आठ जण नर्मदेत बुडाले; सहा मुलांचा समावेश

गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सुरतहून फिरण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नर्मदा नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले असता सहा मुलांसह आठ जण नदीमध्ये बुडाले आहेत.

सदर घटना गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील पोइचा गावामध्ये मंगळवारी (14 मे 2024) दुपारी 12 च्या सुमारास घडली. पीडित कुटुंब आंघोळ करण्यासाठी नर्मदा नदीमध्ये उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कुटुंबातील आठ जण बुडाले. यापैकी एका व्यक्तिला वाचवण्यात यश आले तर, अन्य सात जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीमध्ये बुडालेल्या कुटुंबीयांमध्ये सात ते 15 वर्षांच्या सहा लहान मुलांचा समावेश आहे. तसेच एका 45 वर्षीय व्यक्तीचा सुद्धा समावेश आहे. “17 जणांचा एक ग्रूप फिरण्यासाठी सुरतहून आला होता. त्याच ग्रूपचे हे सर्व सदस्य होते. एका मंदिरामध्ये पूजा आटपून नर्मदा नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी हे सर्वजण पोइचा या गावामध्ये आले होते,” अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. राजपिपला शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक बेपता झालेल्यांचा शोध घेत आहेत.