नासाच्या अंतराळयानाला पाहून गुरूच्या उपग्रहाने वाजवल्या शिट्या, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. गुरू या ग्रहाभोवती 79 चंद्र म्हणजे उपग्रह आहेत. त्यातल्या 53 जणांचं नाव ठेवण्यात आलं असून अद्याप 26 उपग्रहांना नाव ठेवण्यात आलेलं नाही. याच दरम्यान, गुरूचा सर्वात मोठा उपग्रह असलेल्या गॅनिमीडने नासाचं अंतराळ यान जवळून जाताना शिट्या वाजवल्या आहेत.

नासाने जूनो हे अंतराळ यान गुरूच्या आसपास संशोधन करण्यासाठी पाठवलं आहे. ते जून महिन्यात गॅनिमीडजवळून जात असताना शिट्ट्या वाजवल्याप्रमाणे आलेला आवाज जूनोने रेकॉर्ड करून ठेवला आहे. जवळपास पन्नास सेकंदांची ही ध्वनिफीत आहे. जूनोचे प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर म्हणून काम करणाऱ्या स्कॉट या संशोधकाने याची माहिती दिली आहे.

वास्तविक हा आवाज गुरूच्या चुंबकीय क्षेत्रादरम्यान होणाऱ्या विद्युत आणि चुंबकीय रेडिओ लहरींचा आवाज आहे. हा आवाज एका विशिष्ट अंतरावरून शिटी मारल्याप्रमाणे ऐकू येतो. तोच नेमका जूनोने रेकॉर्ड केला आहे. या रेडिओ लहरींवरून गॅनिमीड या चंद्राच्या चुंबकीय क्षेत्रात सतत होणाऱ्या बदलाची माहिती मिळत आहे. त्यामुळे या आवाजाचं तपशीलवार परीक्षण करण्यात येत आहे.

आयोवा विद्यापीठातील ध्वनितरंगांचे तज्ज्ञ विल्यम कर्थ यांच्या म्हणण्यानुसार, जूनोने गॅनिमीडच्या सभोवती वेगवेगळ्या वेळी परिभ्रमण केलं तर कदाचित वेगवेगळे आवाज ऐकायला येऊ शकतील. किंवा चुंबकीय क्षेत्राच्या अजून जवळ गेलं तर तोच आवाज वेगळा येऊ शकतो.

ऐका गॅनिमीडचा आवाज –