
नासाचे हिंदुस्थानी वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएएस) जाणार आहेत. त्यांचे नाव नासाने आयएएस क्रूसाठी निश्चित केले आहे. अनिल मेनन फ्लाईट इंजिनीअर आहेत आणि ते एक्सपीडिशन 75 क्रूचे सदस्य असतील.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेनन रोस्कोमोस सोयूज एमएस- 29 अंतराळयानात स्वार होऊन जून 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी रवाना होतील. त्यांच्यासोबत आणखी दोन अंतराळ प्रवासी असतील. रोस्कोमोस सोयूज हे यान कझाकस्तानच्या बाइकोनूर कॉस्मोड्रोम येथून उड्डाण घेईल. हे मिशन आठ महिने सुरू राहील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनिल मेनन विविध प्रयोग करतील, ज्याचा फायदा भविष्यात माणसाला अंतराळ मोहिमांमध्ये होईल. अनिल मेनन यांची 2021 साली नासामध्ये अंतराळ यात्री म्हणून निवड झाली होती. अंतराळ यात्री म्हणून आपले ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या मिशनची तयारी सुरू केली. मेनन यांचे आई-वडील हिंदुस्थानी आणि युक्रेनी वंशाचे आहेत. अनिल मेनन यांनी हावर्ड युनिव्हर्सिटीची न्यूरोबायोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे.