तप्तपदी सूर्याभोवती

दा. कृ. सोमण  dakrusoman@gmail.com

‘नासाच्या पार्कर सोलर प्रोब’ या यानाने रविवार 12 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या केप कॅनव्हेरल येथील तळावरून सूर्याकडे झेप घेतली आहे. हे यान पृथ्वीपासून दूर आणि सूर्याच्या जवळ किती अंतरावरून सूर्याचे निरीक्षण करणार आहे याचा अंदाज येऊ शकेल.

पौराणिक कथांमधून हनुमानाने जन्म होताच सूर्याकडे झेप घेतली असा उल्लेख आढळतो, पण यावेळी खरोखरच प्रत्यक्षात ‘नासाच्या पार्कर सोलर प्रोब’ या यानाने रविवार 12 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या केप कॅनव्हेरल येथील तळावरून सूर्याकडे झेप घेतली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर यान’ सूर्याच्या अगदी जवळ 61 लक्ष 60 हजार किलोमीटर अंतरावर जाणार आहे. सूर्य पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. त्यावरून हे यान पृथ्वीपासून दूर आणि सूर्याच्या जवळ किती अंतरावरून सूर्याचे निरीक्षण करणार आहे याचा अंदाज येऊ शकेल.

या मोहिमेची काही वैशिष्टय़े आहेत- (1) सूर्याच्या अभ्यासासाठी सूर्याच्या इतक्या जवळ यान जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणून ही अंतराळ मोहीम ऐतिहासिक आहे. (2) या यानास ‘पार्कर सोलर प्रोब’ हे नाव देण्यात आले आहे. युगेन पार्कर हे गृहस्थ 91 वर्षांचे असून त्यांनी 1958 मध्ये सोलर विंडचा म्हणजे सौरवाताचा शोध लावला. एखाद्या यानास जिवंत शास्त्रज्ञाचे नाव देण्याची गोष्ट ही प्रथमच घडत आहे. (3) सोलर करोना म्हणजे प्रभाकिरीट, सौरवात,  सौरकण आणि मॅग्नेटिक फिल्ड यांचा सूर्यापासून 61 लक्ष किलोमीटर अंतरावरून प्रथमच अभ्यास करण्यात येणार आहे. (4) सूर्याकडे पाठविलेल्या या यानावर अगोदर मागवून घेतलेल्या अकरा लक्ष लोकांची नावे पाठविण्यात आली आहेत. (5) पार्कर सोलर प्रोब हे यान सात वर्षे काम करीत राहणार आहे. (6) या मोहिमेसाठी सुमारे दीड अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आला आहे. (7) वाढत्या तापमानापासून यान सुरक्षित राहण्यासाठी या यानाला आधुनिक थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम बसविण्यात आली आहे. (8) शुक्र ग्रहाच्या भोवती काही फेरे मारून त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन या यानाचा वेग ताशी सात लक्ष किलोमीटर एवढा प्रचंड करण्यात येणार आहे. आतापर्यंत इतक्या प्रचंड वेगाने कोणत्याही यानाने अंतराळात भ्रमण केलेले नाही. (9) हे यान सात वर्षांत 24 वेळा सूर्याला फेऱया मारणार आहे. (10) या यानाचा आकार छोटय़ा कारएवढा आहे.

सूर्याचे रहस्य !

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकते त्यावेळी आपणांस त्या बिंबांभोवती करोनाचे दर्शन होते. करोनाला मराठीत ‘प्रभाकिरीट’ म्हणतात. 16 फेब्रुवारी 1980 आणि 24 ऑक्टोबर 1995 रोजी हिंदुस्थानातून दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी मी हा करोना पाहिला आहे. तुमच्यापैकी काही जणांनीही तो त्यावेळी पाहिला असेल. विशेष म्हणजे या करोनाचे तापमान हे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. यामागचे रहस्य काय आहे याचा उलगडा या पार्कर सोलर मोहिमेमुळे होणार आहे.
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6 हजार सेल्सियस एवढे आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी तापमान कमी म्हणजे सुमारे 4 हजार अंश सेल्सियस असते, पृथ्वीवरून सूर्याचे निरीक्षण करताना त्या ठिकाणी काळे डाग दिसतात. यांना ‘सौर डाग’ असे म्हणतात. सौर डाग निर्माण होणे आणि काही कालानी सौर डाग नाहीसे होणे हे सतत चालू असते. सर्वसाधारण डागांचा आकार हा 1500 किलोमीटर इतका असतो. सौर डागांचे गट असतात. एका गटात दोनपासून वीसपर्यंत डाग असू शकतात. या सौर डागांचे ‘एकादशवर्षीय चक्र’ म्हणतात. साधारणतः 11.1 वर्षांनी सौर डागांची संख्या जास्त होते. अशा वेळी सूर्यबिंबावर एकाच वेळी शंभराहून अधिक डाग दिसून येतात. प्रत्येक खग्रास सूर्यग्रहणात करोनाचा आकार वेगवेगळा दिसतो. सौर डाग आणि करोनाचा आकार यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असावा असे काही शास्त्रज्ञांना वाटते. तसेच करोनाचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा जास्त कसे आहे याचे कुतूहल शास्त्रज्ञांना आहे.

सूर्य सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला. तो ‘जी’ प्रकारचा तारा आहे. त्यामध्ये 73 टक्के हायड्रोजन आहे. त्याचे हिलियममध्ये रूपांतर होत आहे. ही अणुभट्टी सतत चालू आहे. सूर्यामध्ये 25 टक्के हिलियम आहे. अजून पाच अब्ज वर्षे सूर्य जगू शकेल, पण त्याची चिंता करू नका. कारण त्यापूर्वीच पृथ्वीवरची सारी माणसे दुसऱया सूर्याच्या ग्रहावर राहायला गेली असतील. सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी आहे.

सूर्याच्या अंतर्भागाबद्दल सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱया फोटॉन कणांद्वारे काही माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. अजून बरीच माहिती मिळणे आवश्यक आहे. नासाच्या पार्कर सोलर प्रोब या यानामुळे सूर्याविषयी बरीच माहिती शास्त्रज्ञांना मिळू शकेल. सूर्याच्या रचनेचा आज जो सर्वसामान्य सिद्धांत आहे त्यामध्ये काही त्रुटी आहेत. या यानामुळे त्या दूर होतील असा विश्वास वाटतो. आपल्या हिंदुस्थानची इस्रो ही अंतराळ संशोधन संस्थांनी लवकरच सूर्याकडे आदित्य-1 हे यान पाठविणार आहे. पृथ्वीवरील वातावरणात होणारा बदल (ग्लोबल वार्ंमग) हा सूर्यावर होणाऱया बदलामुळे होत आहे का ? या प्रश्नाचे उत्तर या संशोधनामुळे मिळू शकेल. म्हणूनच आज पृथ्वीवरचे सर्व शास्त्रज्ञ या पार्कर सोलर प्रोबवर लक्ष ठेवून आहेत.

सूर्यापासून प्रकाश किरण निघाला की, दर सेकंदास तीन लक्ष किलोमीटर वेगाने पृथ्वीवर यावयास त्यास साडेआठ मिनिटे लागतात, परंतु या संशोधनामुळे पंधरा कोटी किलोमीटर इतक्या दूर अंतरावर असणारा सूर्य अधिक संशोधनासाठी पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांच्या अधिक जवळ आला आहे हे नक्की!