बिबट्याचा गोठ्यावर हल्ला, शेळी ठार

राहाता शहराजवळ बिबट्याचा वावर वाढला असून बुधवारी रात्री कार्ले वस्तीमधील गोठ्यावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याने शेळीवर झडप घातली व तिला ओढत नेले. मात्र गावकऱ्यांनी त्याला हुसकावुन लावले. पण यात शेळीचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमद्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले यांनी केली आहे.

बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीतील अरूण बाबूराव कार्ले यांच्या गोठ्यात बिबट्या घुसला. गोठ्यातील शेळी ओढून नेत असताना कुत्रे का भूंकतात म्हणून लोक बाहेर आले तर समोर बिबट्या शेळीला ओढताना दिसला. यावेळी अनेकांनी आरडाओरड केली व फटाके वाजवून बिबट्याला पळवून लावले . मात्र तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने संपुर्ण कार्ले वस्तीवरील लोकांनी शेकोट्या पेटवून रात्र जागून काढली.

गेल्या काही वर्षापासून राहाता अस्तगांव एकुरखा परीसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आतापर्यंत चार ते पाच बिबटे वनविभागाने पकडलेही. मात्र गेल्या काही दिवसापासून पुन्हा या परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या व कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. तो आता थेट लोकवस्तीतही घुसू लागल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. परीसरात चिकू व पेरू बागांमधे लपण्यासाठी जागा असल्याने त्याचा मुक्काम याच परीसरात आहे. त्याचा बंदोबस्त करण्यात  यावा अशी मागणी शेतकरी करत आहे. परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे उघड्यावरच बांधलेली असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या