नाशिक : प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त इतरत्र सेतू, महा-ई-सेवा, आधार नोंदणी केंद्र सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील सेतू, महा-ई-सेवा आणि आधार नोंदणी केंद्र आता कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करीत सुरू करता येणार आहेत. ही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता आहे. हे करत असतानाच विविध औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व काळजी घेवून सेतू, महा-ई-सेवा व आधार नोंदणी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. येथील संचालकांनी केंद्रातील सर्व उपकरणे, सामग्री आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. येथे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना आधी अॅपॉइंटमेंट दिली जाणे गरजेचे आहे. येथील संचालकांनी कोव्हिडच्या हॉटस्पॉट असलेल्या भागात जाणे किंवा अशा भागातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रात येणाऱया प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करून त्यांची दैनंदिन नोंद ठेवावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. यानुसार तत्काळ कार्यवाही करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.