एमआयडीसीच्या अभियंत्याला एक कोटीची लाच घेताना अटक, नाशिक एसीबी युनिटची कारवाई

ठेकेदाराकडून एक कोटी रुपयांची लाच घेणाऱया नगर एमआयडीसीतील सहाय्यक अभियंत्याला नाशिक ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याचा वरिष्ठ तत्कालीन उपविभागीय अभियंता फरार असून, पथक त्याचा शोध घेत आहे. ही आतापर्यंतची विभागातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

नगर एमआयडीसीतील मुळा धरण ते टेहरेपर्यंत 100 एमएम व्यासाच्या लोखंडी पाईप लाईनचा 30 कोटी 67 लाखांचा ठेका सन 2019 मध्ये एका ठेकेदाराला मिळाला होता. त्याची 1 कोटी 57 लाखांची अनामत रक्कम, सुरक्षा ठेवीचे 94 लाख 71 हजार व एक पेंडिंग बिल असे 2 कोटी 66 लाख रुपयांचे बिल मिळणे बाकी होते. ते काढून देण्यासोबतच आधीच्या कामाचे बक्षीस म्हणून नगर उपविभागाचा सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (32) याने स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी एक कोटीची लाच मागितली. ही तक्रार येताच नाशिक एसीबीने 20 ऑक्टोबरला पडताळणी केली. त्यानंतर काल शुक्रवारी अमित गायकवाडला लाच घेताना नगर येथे अटक करण्यात आली.

तुझ्या कष्टाचं फळ मिळालं

सहाय्यक अभियंता अमित गायकवाडचा वरिष्ठ अधिकारी तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ हा सध्या धुळे येथे कार्यकारी अभियंता आहे. त्याचा लाच प्रकरणात सहभाग निष्पन्न झाला आहे. दोघांचे लाच घेण्याआधीचे व नंतरचे संभाषण समोर आले आहे. तुझ्या कष्टाचे फळ मिळाले, असे ते बोलत होते, अशी माहिती एसीबीचे अपर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.