मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा निषेध; नाशिकसह जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तणावपूर्ण शांततेत बंद पार पडला. ठिकठिकाणी निदर्शने करून, फेरी काढून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय त्वरित न घेतल्यास सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

नाशिक शहरात आज सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चासह सर्व विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, विलास शिंदे, शिवाजी सहाणे, देवानंद बिरारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले. सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, मेनरोड, महात्मा गांधी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी रॅली काढली. बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. मेनरोड, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर रोड, शरणपूर रोड, कॉलेजरोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड भागात व्यावसायिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. महेश बडवे, मामा राजवाडे, योगेश देशमुख, आशिष हिरे, दिनेश नरवडे, सागर जाधव, विशाल घागस, विशाल पगार, प्रफुल्ल वाघ, नीलेश कुसमुडे, चेतन पाटील, चेतन दाते, नागेश शिंदे, अमोल पाटील, किरण पाटील, माधवी पाटील, मनोरमा पाटील, पुष्पा जगताप, सुलोचना भोसले, ममता शिंदे, रागिनी आहेर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले.

अंदरसूलमध्ये चक्का जाम

येवला तालुक्यातील अंदरसूल येथे नाशिक-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सरकारचा निषेध करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. अंदरसूल गाव बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख झुंजार देशमुख, बाजार समिती सभापती किसन धनगे, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, डॉ. संकेत शिंदे, अमोल सोनवणे, शिवाजी वडाळकर, गणपत देशमुख, काकासाहेब देशमुख, योगेश खैरनार, बाळासाहेब पागेरे, नंदकिशोर धनगे, संतोष वल्टे, अण्णासाहेब ढोले, प्रमोद देशमुख, तेजराज जहागीरदार, सोपान आवटे, जनार्दन जानराव, अमोल आहेर, योगेश खैरनार, दिनेश पागेरे, नंदकिशोर धनगे, महेश देशमुख, शंकरराव गायकवाड, दत्तात्रय थोरात, दत्तात्रय हांडोळे आदी सहभागी झाले होते.

उमराणे, दहिवडमध्ये उत्स्फूर्त सहभाग

देवळा तालुक्यातील उमराणे, दहिवड या गावांमध्ये रविवारी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिवसभर सर्व व्यवहार बंद होते. नागरिकांनी निदर्शने करीत सरकारी दहशतीचा निषेध केला. उद्या सोमवारी देवळा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी सटाण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

लिलाव बंद

अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ निफाड, विंचुर आणि लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा, धान्य लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बससेवा बंद

तणावाची परिस्थिती लक्षात घेवून एसटी महामंडळही सावध झाले आहे. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या काही एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. बस लक्ष्य होवू नये, यासाठी ठिकठिकाणी महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सटाणा तालुक्यातील नामपूर येथे रविवारी बंद पाळण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह सर्व विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. रास्ता रोको करून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात विनोद सावंत, जितेंद्र सूर्यवंशी, ए. डी. पाटील, मनोहर पाटील, नारायण सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पांगरीत धरणे

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. सिन्नर-शिर्डी महामार्गावर त्यांनी धरणे आंदोलन केले. उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची, तसेच लाठी हल्ल्यास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. विलास पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, विजय काटे, आत्माराम पगार, संपत पगार, जगन पगार, किसन वारुळे, पोपट दळवी, विलास कलकत्ते, प्रवीण शिंदे, राजू नवले, चंद्रशेखर रोकडे आदी या आंदोलनावेळी हजर होते.

कळवणमध्ये भव्य रॅली

कळवण शहरात शनिवारी सकल मराठा समाज, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भव्य दुचाकी रॅली काढली, रविवारच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. लाठी हल्ल्यास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करावी, मराठा आरक्षण त्वरित लागू करावे आदी मागण्यांच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, संभाजी पवार, जितेंद्र वाघ, अजय पगार, किशोर पवार, चंद्रकांत बुटे, सचिन पगार, अशोक निकम, मोतीराम निकम, सनी पगार, राजेंद्र पवार, रामा पाटील, अभिमन भिकन, संदेश जाधव, प्रदीप पगार, तेजस पगार, प्रमोद रौंदळ, हेमंत पाटील, बाळासाहेब पगार, अनुप देवरे, बाळा पवार, समाधान शिंदे, बाळासाहेब जाधव, दीपक देवरे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.