
सततच्या पावसाने झालेले नुकसान आणि मागणीअभावी कोसळलेल्या बाजारभावामुळे जिह्यातील भाजीपाला उत्पादक हवालदिल आहेत. कोथिंबीर, लिंबू, डांगराला मातीमोल दर पुकारला जात असून, त्यातून साधा वाहतूक खर्चही सुटत नसल्याने शेतकरी शेतमाल नाशिक बाजार समिती आवारात फेकून घरचा रस्ता धरत आहेत. मागील महिन्यात कोथिंबिरीची प्रतिजुडी किमान 10, सरासरी 40, कमाल 58 रुपयाला विक्री होत होती, तिची आवक आता सवा लाख जुडय़ांवर पोहोचल्याने दर निम्म्यावर आले आहेत. येथे मंगळवारी किमान 5, सरासरी 25 दर मिळाला. हायब्रीड कोथिंबिरीला व्यापारी प्रतिजुडी 1 ते 2 रुपये असा मातीमोल भाव देऊ करत असल्याने काही शेतकऱयांनी ती विकण्याऐवजी आवारात फेकून दिली.
मे महिन्यापासून जिह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतातच पालेभाज्या, फळभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱयांना मोठा फटका बसला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिकसह दिंडोरी, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातून मोठय़ा
प्रमाणात भाज्या येत आहेत. येथून मुंबई आणि गुजरातच्या अहमदाबादला त्याचा पुरवठा होतो, परंतु सध्या गुजरातसह इतर राज्यांतही स्थानिक उत्पादन अधिक असल्याने आपल्याकडील मालाला तितकासा उठाव नाही. स्थानिक बाजारातही मागणी घटल्याने दरावर परिणाम झाला आहे.
वाहतूक खर्चदेखील सुटणार नाही
अस्मानी, सुल्तानी संकटांचा फटका लिंबू आणि डांगर उत्पादकांनाही बसला आहे. आंध्र प्रदेश तसेच राज्यातील इतर भागातून मोठय़ा आकाराचे लिंबू बाजारात दाखल झाले आहेत. येथे मंगळवारी लिंबूची आवक 22 क्विंटल होती, तर दर अवघा 5 ते 11 रुपये किलो मिळत होता. डांगरालाही 5 ते 8 रुपये किलो इतका मातीमोल भाव पुकारला जात होता. विक्री करून हाती येणाऱया पैशातून वाहतूक खर्चही सुटणार नाही, ही चिन्हे बघून माल रस्त्यावर फेकण्याशिवाय उत्पादकांना पर्याय उरला नाही. सगळी मेहनत वाया गेल्याने ते हतबल झाले आहेत.