नाशिक – लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी खरेदीसाठी गर्दी उसळली, शहरात सगळीकडे वर्दळच वर्दळ

नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून 23 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी आज किराणा, भाज्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. यामुळेच कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याची भीती आहे.

नाशिक शहरापाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना बळींची संख्या 40 हून अधिक असते, ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत 12 मेच्या दुपारी बारा वाजेपासून 23 मेच्या मध्यरात्री बारापर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना या काळात घराबाहेर पडता येणार आहे. किराणा दुकानदारांना केवळ होम डिलिव्हरीची सुविधा देता येणार आहे. यामुळे लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी मंगळवारी खरेदीसाठी रविवार कारंजासह पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, सिडको या सर्वच भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सर्व भाजी बाजारांमध्येही अशीच परिस्थिती होती. पेट्रोलपंप, धान्य, किराणा दुकानांपुढे नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. कोरोना संकटाचे गांभीर्य नागरिकांना नसल्याचे यावरून दिसून आले, अशीच परिस्थिती असल्यास कोरोना संसर्ग नियंत्रणात येईल कसा, हा प्रश्न असून उद्यापासून लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या