प्रतिबंधित क्षेत्रात दोनशे पथके कार्यरत; नाशिक शहरात रुग्णांचे सर्वेक्षण सुरू- महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे

1100

>> बाबासाहेब गायकवाड, नाशिक

नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. हे रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात संशयितांची तपासणी करण्यासाठी दोनशे पथके कार्यरत करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरात रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘सामना’ला दिली.

शहरातील स्थिती तशी नियंत्रणात आहे. मात्र, बाहेरगावहून येणार्‍या नागरिकांमुळे पाच-सहा दिवसांपासून रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबई, मालेगावसारख्या शहरातून काही लोक परवानगी घेवून येतात, तर काही विनापरवानगी येत आहेत. याशिवाय शहरात मोठे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठीही रुग्ण येतात, ते पॉझिटिव्ह आढळतात. त्यांच्या संपर्कातील त्यांचे नातेवाईक बाधित होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वेगात सुरू आहे. मालेगाव, मुंबईसह इतर शहरात स्थायीक व नोकरी करणारे लोक नाशिकमध्ये विनापरवाना आले तर त्यांना त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीवरून घरी किंवा शहरातील केंद्रावर क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन रुग्ण बाहेर गेला तर महाकवच ऍपद्वारे महापालिका व पोलीस यंत्रणेला त्वरित सूचना मिळते व संबंधित क्वारंटाईन व्यक्तींवर कार्यवाही केली जाते. सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी बाहेरगावहून प्रशासनाची परवानगी न घेता आलेल्या व्यक्तींची माहिती महापालिकेला कळवून जागरूकता दाखवावी, असे आवाहन आयुक्त गमे यांनी केले.

संपूर्ण शहरातच रुग्ण सर्वेक्षण सुरू आहे. दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी अशा सुमारे 70 हजार लोकसंख्येच्या भागात आरोग्य तपासणी सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात दोनशे पथके कार्यरत करण्यात आली आहेत, घरोघरी जावून माहिती घेतली जात आहे. दमा, हृदयरोग, मधुमेह, गरोदर महिला, लहान मुले यांना थंडी, तापासह इतर आजारावर त्याच भागात ओपीडी सुरू करून उपचार दिले जात आहेत. कोरोनाची लक्षणे असणार्‍या संशयितांची चाचणी केली जात आहे. अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊनमधून थोडीशी ढिलाई देण्यात आली. मात्र, त्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जनतेने सहकार्य करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. महापालिका प्रशासन, आरोग्य, वैद्यकीय विभाग, पोलीस व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय आणि शासनाचे मजबूत पाठबळ यामुळे शहरातील स्थिती नियंत्रणात आहे, असे शेवटी आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या