
यंदा नाशिक जिह्यातील धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून 103.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, तर जायकवाडीतून खाली पुन्हा गोदावरीत तब्बल 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 1969 साली तब्बल 185 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 1981 साली 130 टीएमसी पाणी त्यानंतर 2005 मध्ये 170 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 2006 साली 162 टीएमसी पाणी गोदावरीतून वाहिले. त्यानंतर 2022 मध्ये 125 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गेल्या वर्षी 2024 मध्ये 58.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यंदा 17 नोव्हेंबरअखेर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने 103.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला.
यंदा धरणाच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने पाणीच पाणी केले. नांदूर मधमेश्वर बंधाऱयातून जायकवाडीच्या दिशेने 11 लाख 99 हजार 720 क्युसेक पाणी वाहिले. म्हणजेच 1 लाख 3 हजार 692 दलघफू पाणी वाहिले हे पाणी 103.6 टीएमसी इतके आहे. सध्या नाशिकच्या धरणांमध्ये उपयुक्त साठा 98.53 टक्के इतका आहे. गतवर्षी कालच्या तारखेला तो 98.15 टक्के इतका होता.
यंदा नाशिकच्या दारणातून 29.3 टीएमसी, गंगापूरमधून 12.1 टीएमसी, कडवातून 6.6 टीएमसी, मुकणेतून 1.2 टीएमसी, भोजापूरमधून 459 दलघफू, आळंदीतून 1.9 टीएमसी, वालदेवीतून 2.2 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग तसेच मुक्त पाणलोटातूनही पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल झाल्याने या बंधाऱ्यातून यंदा 103 टीएमसीहून आधिक पाण्याचा विसर्ग झाला. याशिवाय नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याचा पूर्व भाग ते जायकवाडीचे बॅकवॉटरपर्यंच पावसाचे पाणी जायकवाडीत दाखल झाले. मुळा तसेच प्रवरेतील पाणीही मोठ्या प्रमाणात जायकवाडीत वाहून आले. याशिवाय मराठवाड्यातील पावसाचे पाणीही जायकवाडीत दाखल झाले.
नाशिक जिह्यातील सर्वच बंधाऱ्यांचे विसर्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून कालही 400 क्युसेकने विसर्ग सुरू होता. 4 ते 5 दिवसांत हा विसर्ग बंद होण्याची शक्यता आहे.




























































