मोकाट फिरणाऱ्यांची जागेवरच टेस्ट करणार, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती

नगर जिह्यातील कोरोना रुग्ण शोधण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आरटीपीसीआर टेस्ट व्हायला पाहिजेत. मात्र, त्या होत नाहीत ही गंभीर बाब आहे. आगामी काळात जास्तीत जास्त टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मोकाट फिरणाऱयांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. दरम्यान, गुजरातवरून विमानाने ऑक्सिजन आणण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गेल्या 10 दिवसांत जिह्यात म्हणाव्यात अशा कोरोना चाचणी होत नाहीत. दररोज रुग्णसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला किमान 80,000 चाचण्या तरी केल्या पाहिजेत, असे सिद्ध होते. पण, सध्या आरटीपीसीआर टेस्ट किट उपलब्ध नाही, त्यामुळे टेस्ट होत नाहीत ही बाब गंभीर आहे. किट उपलब्ध करून टेस्ट वाढवाव्यात, असे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे काही करायचे आहे, त्याचे नियोजन करा. जे लोक रस्त्यांवर मोकाट फिरत आहेत, त्यांचीही जागेवरच टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱयांना तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचनाही गमे यांनी दिल्या तसेच लोकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तालुकास्तरावर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढवा

– जिह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला. पुढील 10 दिवसांत संभाव्य रुग्णांची संख्या लक्षात घेऊन किमान एक हजार ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले असून, तालुकास्तरावर ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नागरिकांनीही आता कोरोना संसर्गाची गती पाहाता प्रतिबंधात्मक नियमांची स्वतःहून अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या