नाशिक ग्रामीण अपघाताचा हॉटस्पॉट. दहा महिन्यांत 566 अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षात नाशिक ग्रामीण अपघाताचा हॉटस्पॉट ठरला आहे. गेल्या दहा महिन्यात नाशिक ग्रामीणमध्ये तब्बल 566 अपघातांची नोंद झाली असून त्यात 610 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिह्यात सर्वांत कमी अपघाताची नोंद झाली. या जिह्यात केवळ 38 अपघात झाले असून त्यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोव्हिड-19च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून सर्वत्र लॉकडाऊन लागू झाला. मात्र तरी देखील जानेवारी पासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यभरात तब्बल आठ हजार 125 अपघातांची नोंद झाली असून त्यात आठ हजार 747 जणांचा बळी गेला आहे. संपूर्ण राज्यात अपघातांच्या बाबतीत नाशिक ग्रामीणचा भाग अव्वल ठरला आहे. तर ग्रामीणच्या तुलनेत नाशिक शहरात या दहामहिन्यांमध्ये 111 अपघात होऊन त्यात 119 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, वर्ष 2019 मध्ये याच दहा महिन्यांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये 608 अपघात झाले होते आणि त्यात 664 जणांचा बळी गेला होता.

दहा महिन्यात मुंबईमध्ये 223 अपघाती मृत्यू

शहरांच्या बाबतीत सोलापूर शहरात सर्वात कमी अपघाताची नोंद झाली. दहा महिन्यात सोलापूरात केवळ 47 अपघात होऊन त्यात 50 जण ठार झाले.तर मुंबईत 212 अपघातात 223 मृत्यू, नागपुर शहरात 145 अपघातात 156 मृत्यू, पुणे शहरात 105 अपघातात 110 मृत्यू, ठाणे शहरामध्ये 140 अपघातात 146 मृत्यू, नाशिक शहरात 111 अपघात आणि 119 मृत्यू, नवी मुंबईत 145 अपघात आणि 147 मृत्यू, अमरावती शहरात 58 अपघातात 63 मृत्यूची नोंद झाली आहे.

अपघाताचीं टॉप ठिकाणे

  • नाशिक ग्रामीण- 566 अपघात, 610 मृत्यू
  • नगर जिल्हा- 499 अपघात, 520 मृत्यू
  • पुणे ग्रामीण- 490 अपघात, 520 मृत्यू
  • जळगाव – 339 अपघात, 373 मूत्यू
  • सोलापूर ग्रामीण- 279 अपघात, 305 मृत्यू
  • धुळे- 277 अपघात, 308 मृत्यू