येवल्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

619

गेल्या चार दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मानोरीत 13 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पट्ट्यातील अनेक गावांत शेतीतील उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचेही नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे पावसापासून वंचित राहत असल्याने या गावपरिसरातील वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने अनेक गावांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर काही भागांत पावसाने हजेरीही न लावल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टँकर सुरू आहेत. येवला तालुक्यातील मानोरी, देशमाने, पिंपळगाव लेप, पाटोदा, सोमठाण देश, शिरसगाव लौकी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तर राजापूर परिसरातील शेतकरी अजूनही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. तालुक्यातील मानोरी परिसरात मुसळधार पावसाने सुमारे 13 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांच्या भिंती पडून अंदाजे चार लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून यात मातीच्या धाब्याच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. पाऊस जोरदार पडत असल्याने अ मातीच्या अनेक घरांचे छत कोसळले असून काही घरांच्या भिंतीदेखील पडल्या असल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. पडलेली घरे पुन्हा बांधून देण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी कुटुंबांनी केलेली आहे.

शिरसगाव लौकी परिसरातही पावसाने दाणादाण उडवली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर पालखेड डाव्या कालव्यालाही पाणी सुरू असल्याने उभ्या पिकांमध्ये जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत आहे. पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल आहेत. गोठ्याची जमीन पूर्णपणे ओली असल्याने जनावरांना बसण्यासाठी जागा नाही. चारा कापायला गेल्यावर गुडघ्यावर पाय चिखलात जात असल्याने चारा कापणेही शक्य होत नसल्याने उपाशीपोटी राहण्याची वेळ जनावरांवर आली आहे.

घरांचे नुकसान

अमोल सूर्यभान शेळके, यमुनाबाई मनोहर गाडेकर, मंदाबाई रामभाऊ शेळके, वसंत दामू शेळके, मधुकर बहिरूनाथ भवर, शीला विठ्ठल पठाडे, कल्पना शंकर वाघ, रवींद्र सर्जेराव पवार, सुदाम बाळू बोराडे, कुसुम मारुती रायजादे, छगन दगू साळवे, लक्ष्मीबाई मारुती डुकरे, बाळू काळू शिंदे, संतोष गोपाळ चव्हाण असे एकूण 13 घरांचे अंदाजित चार लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या उत्तरा नक्षत्राच्या पावसामुळे पावसाच्या पाण्याने विहिरी पूर्ण भरून वावरातून पाणी वाहत आहे. मका पीक पूर्णपणे पाण्यात आहे. लाल कांद्याच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. उन्हाळ कांद्याचे रोप चिमटणीला आल्यावर खराब व्हायची वेळ आली आहे तर टोमॅटोचा पाला गळून पडल्याने फळावर काळे डाग पडायला लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या