नाशिक- आतापर्यंत सतराजणांना कोरोना नाही, चार संशयितांचा रिपोर्ट येणे बाकी

745

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ात 19 कोरोना संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात पाठविण्यात आले होते, त्यापैकी 17 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, दोघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. जिल्हा रुग्णालयात आज आणखी दोन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे एकूण चौघांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात 29 फेब्रुवारीपासून आजपर्यंत एकूण 53 जणांची तपासणी करण्यात आली. थंडी, ताप, घशात खवखव, सर्दी यांची तीव्र लक्षणे असणाऱ्या 19 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्राकडे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 17 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शनिवारी, 14 मार्चला आणखी तिघांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 5 मार्चला बांग्लादेशातून आलेल्या 42 वर्षीय पुरुष व सहा दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून नाशिकला आलेल्या 29 वर्षीय तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात सध्या दाखल रुग्णांची संख्या 7 इतकी असून, त्यातील तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, उर्वरित चौघांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निखील सैंदाणे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या