
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात ऐन डिसेंबरमध्येच पाणीप्रश्न बिकट झाला आहे. जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, सटाणा, चांदवड, देवळा या सात तालुक्यांतील 281 वाडया व 95 गावांना 101 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर 26 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यावर्षी राज्यात सर्वत्रच कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. नाशिक जिह्यातील 15 पैकी 7 तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न गंभीर असल्याने जनावरांना चारा-पाणी मिळणार कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, मालेगाव, सिन्नर या तालुक्यांमध्ये गंभीर, तर चांदवड, देवळा, इगतपुरी, नाशिक तालुक्यात मध्यम स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे, तसेच दुष्काळी 17 महसुली मंडळांमध्ये कळवण तालुक्यातील कळवण, नवीबेज, मोकभणगी; दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, वरखेडा, दिंडोरी; निफाड तालुक्यातील रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर, निफाड; येवला तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव, जळगाव नेऊर यांचा समावेश करण्यात आला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन टँकर सुरू करण्याचे अधिकार काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱयांकडून प्रांत अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत.
जिह्यात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या तालुक्यातील 11 गावे व 143 वाडय़ांना 28 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल येवल्यात 24 टँकरने 36 गावे, 26 वाडय़ांना; मालेगाव तालुक्यात 22 टँकरने 19 गावे, 62 वाडय़ांना पाणी पुरविण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यात सध्या 4 गावे व 40 वाडय़ांसाठी 7 टँकरने पाणी उपलब्ध करू दिले जात आहे. सटाण्यात 19 गावे, एक वाडी यांच्यासाठी 15 टँकर आहेत. देवळ्यात 5 गावे, 8 वाडय़ांचा पाणीपुरवठा 4 टँकरवर अवलंबून आहे. चांदवडच्या एक गाव व एक वाडीसाठी एक टँकर सुरू आहे. जिह्यात सुरू असलेल्या टँकरमध्ये 18 शासकीय, तर 83 खासगी आहेत. एकूण 26 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, त्यात येवला- 1, मालेगाव- 11, नांदगावमधील 14 विहिरींचा समावेश आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात 82 गावे व 255 वाडय़ांसाठी 85 टँकर सुरू होते, तर अधिग्रहीत विहिरींची संख्या 6 इतकी होती.
डिसेंबरमध्येच गावोगावी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. डिसेंबरमधील ही भीषण परिस्थिती पाहता पुढील सहा महिन्यांत दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढलेली राहील.
























































