
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे सोमवारी दिल्ली येथे वितरण करण्यात आले. मात्र हे पुरस्कार राष्ट्रपतींऐवजी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने ‘धुरळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना तीन तासांसाठी वेळ काढता येत नाही का, असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारला आहे.
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले होते. गतवर्षीदेखील राष्ट्रपतींऐवजी माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. त्यामुळे कलाकारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय? ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला राष्ट्रपतींना तीन तास काढता येत नाहीत? मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूप व्यस्त असतात, पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजित होतं ना! अशा शब्दांत विद्वांस यांनी ट्विटरवरून खदखद व्यक्त केली.
























































