मिंध्यांचा ‘उलटा’ कारभार! पालकमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंग्याचा अपमान; देशप्रेमींचा संताप

राज्यात अनागोंदी सुरू असतानाच आता मिंधे सरकारचा आणखी एक उलटा कारभार समोर आला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत आयुष्मान भारत योजनेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील काल्हेर येथे आयोजित ‘संकल्प यात्रा’ या कार्यक्रमात पालकमंत्री शंभुराज देसाई आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत तिरंग्याचा अपमान झाला. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या मोठ्या बॅनरवर आणि स्क्रीनवर देशाचा झेंडा उलटा फडकवण्यात आला. धक्कादायक म्हणजे मंचावर आणि मंचासमोर बसलेल्या एकाच्याही ही बाब लक्षात आली नाही. यामुळे देशप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, तिरंगा फडकवण्याचे काही नियम आहेत. त्यानुसार तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये. मात्र काल्हेर येथील कार्यक्रमात हिरवा रंग वर आणि केशरी रंग खाली असा झेंडा बॅनरवर लावण्यात आला होता.

कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पालकमंत्री शंभुराज देसाई यांचाही फोटो आहे.