देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा थोडक्यात

इंडिगोला दुप्पट नफा
इंडिगो चालवणारी कंपनी इंटरग्लोब एविएशनला आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाही (31 मार्च 2024 ला संपली) मध्ये एकूण 1894.82 कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत 919.20 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यामुळे या वर्षीचा नफा 106 टक्के जास्त आहे. म्हणजेच इंडिगोला या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट नफा झाला आहे. इंडिगोने वार्षिक सरासरी नफ्यात 25.88 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीची कमाई 17,825.27 कोटी रुपये राहिली.

12 दिवसांत 42 मृत्यू
यमुनोत्री आणि केदारनाथसह चारधाम तीर्थयात्रेचे दर्शन करण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने पोहोचले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतून भाविकांची रीघ केदारनाथला पोहोचली आहे. 10 मेपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत 12 दिवसांत 42 भाविकांचा मृत्यू झाला आहे. कपाट उघडल्यानंतर केदारनाथमध्ये सर्वात जास्त 19 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यमुनोत्रीमध्ये 12, बद्रीनाथमध्ये 9 आणि गंगोत्रीमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

रईसी यांच्यावर अंत्यसंस्कार
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. रईसी यांचे 19 मे रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. इराणमधील शहर मशहद येथे त्यांना दफन करण्यात आले. या दफनविधीला जगभरातील जवळपास 68 देशांचे नेते उपस्थित होते. कतारचे अमीर तमीम बिन हमाद अल थानी, इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्षही आले होते.

ब्रिटनमध्ये निवडणुकीची घोषणा
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कॅबिनेट बैठकीनंतर निवडणुकीची घोषणा केली असून 4 जुलै रोजी मतदान होणार आहे. या वेळी सुनक यांनी मतदारांना आवाहन केले आहे. कठीण काळानंतर देशाला आर्थिक स्थिरता मिळाली आहे. ही केवळ सुरुवात असून तुम्ही त्यावर विश्वास कसा दाखवता आणि या पायाला तुमच्या, तुमच्या कुटुंबासाठी आणि देशाच्या सुरक्षित भविष्यात कसे बदलता, हे पाहणे आवश्यक असल्याचे सुनक यांनी म्हटले आहे.

नवाजुद्दीनच्या भावाला अटक
बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाजुद्दीनला मुझफ्फरनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक फसवणूक केल्याप्रकरणी केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. अयाजुद्दीनविरोधात महिनाभरापूर्वी आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती. 2023 मध्ये चकबंदी न्यायालयात कृषि भूमीसाठी जावेद इकबालसोबत सुरू असलेल्या वादावरून अयाजुद्दीनने प्रार्थना पत्र न्यायालयात सादर केले होते. या वेळी एका बनावट आदेशाचे पत्रही जोडल्याचा अयाजुद्दीनवर आरोप आहे.

तप्त वाळूत जवानाने पापड भाजले
संपूर्ण देशात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. उष्णतेचा कहर पाहता घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांनी दिला जातोय. अशातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. बिकानेर-राजस्थानच्या वाळवंटातील या व्हिडीओत एक जवान तापलेल्या वाळूवर पापड भाजताना दिसत आहे. कडक उन्हातही आपले कर्तव्य बजावणाऱया जवानांचे कौतुक होत आहे.

बिकानेर हा राजस्थानमधील सर्वात उष्ण जिल्हा आहे. या वर्षी बिकानेरमधील तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत पोचले आहे. तिथल्या तप्त वाळवंटात काय परिस्थिती आहे, याचा अंदाज व्हिडीओ पाहून येतोय. व्हिडीयोत बीएसएफ गणवेशातील जवानाने प्रचंड उकाडय़ाने चेहरा व्यवस्थित झाकलेला दिसतो. हातात बंदूक घेतलेला हा जवान वाळूवर पापड ठेवतो आणि वाळूने पापड झाकतो. काही सेकंद थांबल्यानंतर पापडावरील वाळू बाजूला सारून तो पापड बाहेर काढतो. यावेळी पापड पूर्णपणे भाजलेला दिसतो. भाजलेला पापड जवान कडाकडा पापड मोडून दाखवतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. कडक उन्हाची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करणाऱया जवानांचे नेटिजन्स भरभरून कौतुक करत आहेत.

मुंबईतील रेस्टॉरंटचा जगात डंका
जगातील टॉपच्या 100 रेस्टॉरंटमध्ये मुंबई आणि नवी दिल्ली येथील प्रत्येकी एका रेस्टॉरंटची वर्णी लागली आहे. विलियम रिड मीडिया कंपनीने आधी ‘द वर्ल्डस् 50 बेस्ट रेस्टॉरंट’ची यादी यापूर्वी जाहीर केली होती. त्यानंतर कंपनीने आपली यादी अद्ययावत करत आणखी 50 बेस्ट रेस्टॉरंटचा त्यामध्ये समावेश केला आहे. यामध्ये मुंबई येथील ‘मास्क’ रेस्टॉरंटने 78 वे स्थान पटकावले आहे, तर नवी दिल्लीचे ‘इंडियन अॅसेट’ रेस्टॉरंट 89 व्या क्रमांकावर आहे. ‘मास्क’ रेस्टॉरंटच्या संस्थापिका आदिती दुगर आहेत, तर मुख्य शेफ वरूण तोतलानी आहेत. आशियातील टॉप 50 रेस्टॉरंटमध्ये सलग दोन वर्षे त्यांचा समावेश होतो. पारंपरिक आणि आधुनिक खाद्यपदार्थ तिथे मिळतात.

सिमकार्डचा फ्रॉड ओळखा
सिमकार्ड वापरून फ्रॉड करणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. ज्याच्या नावाने सिमकार्ड वापरले जाते त्याला याची कल्पनासुद्धा नसते. त्यामुळे काही गुन्हा घडल्यास ती व्यक्ती अडचणीत येऊ शकते. त्यामुळे तुमच्या नावावर किती सिम ऑक्टिव्ह आहेत, हे दोन ते तीन महिन्यांनी तपासण्याची गरज आहे. असे केल्यास फ्रॉडपासून सुरक्षित राहता येईल. यासाठी कंपन्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. संबंधीत वेबसाईटवर जाऊन या टिप्स पाहता येऊ शकतात. नियमांनुसार एका आयडीवर 9 सिम सक्रिय करता येतात. परंतु अनेकजण केवळ एक पिंवा दोन सिमकार्ड वापरतात. जम्मू-कश्मीर, आसामसह ईशान्य राज्यांच्या आयडीवर केवळ 6 सिम खरेदी करता येतात.

तिसरे महायुद्ध लवकरच…
गेल्या काही दशकांपासून तिसऱया महायुद्धाचे भाकीत वर्तवले जात आहे. त्यावर चर्चा घडवून आणल्या जात आहेत. नॉस्ट्रेडेम्स आणि बाबा वांगा यांच्यासह अनेक मोठय़ा ज्योतिषांनी तिसऱया महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. मात्र कधी होणार हे निश्चित सांगितलेले नाही. अशातच एका हिंदुस्थानी ज्योतिषाची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्योतिषी कुशल कुमार यांनी तिसरे महायुद्ध फक्त काही आठवडे दूर असल्याचा दावा केला. कुशल कुमार हे वैदिक ज्योतिषी आहेत. ग्रहदिशा बघून ते भविष्य सांगतात. त्यांच्या दाव्यानुसार तिसऱया महायुद्धाला 18 जून 2024 रोजी सुरुवात होईल. 10 आणि 29 जूनलाही तशीच ग्रह स्थिती असेल. असे कुशल कुमार यांनी म्हटलंय.

परदेशवारीवर होऊ द्या खर्च
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी देशाबाहेर जाणाऱयांची संख्या जास्त आहे. आर्थिक वर्ष 2024 चा विचार करता, या वर्षी हिंदुस्थानींनी परदेशवारीवर 31.7 अब्ज डॉलर एवढी रक्कम खर्च केली आहे.
हिंदुस्थानींनी ‘लिबराइज्ड रेमिटेन्स स्कीम’अंतर्गत 31.7 अब्ज डॉलर रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली हिंदुस्थानींनी विदेशवारीवर 27.1 अब्ज डॉलर रुपये खर्च केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 17 टक्के वाढ आहे. टीसीएस लागू झाल्यानंतरही ही मोठी वाढ दिसून येत आहे.
विदेशात फिरण्यावर हिंदुस्थानींनी या वर्षी 17 अब्ज डॉलर खर्च केलेत.

आयआयटी विद्यार्थी बेरोजगार
देशातील 23 आयआयटीमधून उत्तीर्ण झालेले तब्बल 38 टक्के विद्यार्थी यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नापास झाले आहेत. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी माहिती अधिकारांतर्गत यंदा आयआयटीमध्ये पार पडलेल्या प्लेसमेंटविषयी माहिती मागविली होती. यात आयआयटीयन्स 38 टक्के विद्यार्थी अद्याप बेरोजगार असल्याचे समोर आले आहे. आयआयटी दिल्लीने तर यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी तसेच कंपनीत त्यांची शिफारस करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना विनंती केली आहे. आयआयटी दिल्लीतील 400 विद्यार्थी अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा 23 आयआयटीमधून सुमारे 7 हजार विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

ऋषद प्रेमजींच्या वेतनात 20 टक्के कपात
विप्रो कंपनीचे संचालक अझीम प्रेमजी यांचा मुलगा ऋषद प्रेमजी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्यांच्या वेतनात 20 टक्के कपात झाली. त्यांना कंपनीकडून कोणताही मोबदला मिळालेला नसल्याने सलग दुसऱया वर्षी त्यांचे वेतन कमी झालेय. विप्रोने युएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे सादर केलेल्या फॉर्म 20 एफ मधून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार ऋषद प्रेमजी यांचे वेतन गेल्या वर्षीच्या 7.2 कोटी रुपयावरून 5.8 कोटी रुपये झाले. तर वार्षिक मोबदल्यात 20 टक्के घट झाली. भरपाई व्यतिरिक्त ऋषद प्रेमजी वाढीव एकत्रित निव्वळ नफ्यावर 0.35 टक्के दराने कमिशनसाठी पात्र आहेत. आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीचा वाढीव एकत्रित निव्वळ नफा नकारात्मक राहिला.

पोलिसांची गाडी थेट रुग्णालयात
आरोपीला पकडण्यासाठी पोलीस व्हॅन थेट हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात नेण्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हृषिकेश एम्स रुग्णालयातील हा धक्कादायक व्हिडीओ आहे. शनिवारी हृषिकेश एम्सच्या ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू होती. त्या वेळी शस्त्रक्रिया विभागात तैनात असलेल्या महिला डॉक्टरचा नार्ंसग अधिकारी सतीश कुमार याने विनयभंग केला होता. या प्रकरणाचा निषेध करीत रुग्णालयातील डॉक्टरांनी संप केला.
पोलिसांनी व्हॅन थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेली. कडक सुरक्षा व्यवस्थेत आरोपीला अटक करण्यात आली. या वेळी सुरक्षा रक्षकांनी शिटय़ा वाजवून रुग्णांचे स्ट्रेचर पटापट बाजूला केले. वॉर्डात पोलिसांची भरधाव आलेली व्हॅन पाहून रुग्णही अवाप् झाले.

सांची, बोधगया, सारनाथ जोडणार
देश-विदेशातील बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी बौद्ध सर्किट तयार केलं जातंय. याअंतर्गत बौद्ध धर्माची प्रमुख केंद्रे एकमेकांना जोडली जातील. सांची व अन्य ठिकाणे थेट बोधगया आणि सारनाथला जोडून बौद्ध सर्किट पूर्ण केले जातील. भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणे जगभरातील बौद्ध अनुयायींसाठी प्रमुख केंद्रे असतात. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने त्यांचे महत्त्व आहे. या सर्व केंद्रांना पर्यटनाच्या दृष्टीने जोडण्याचा मध्य प्रदेश टुरिझम बोर्डाचा बौद्ध सर्किट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
जगभरातील बौद्ध अनुयायी लुम्बिनी, बोधगया, सारनाथमार्गे कुशीनगरला जाऊन देऊर कोठार बुद्ध स्तूपाचे दर्शन घेऊन मध्य प्रदेशात प्रवेश करतात. भरहुत बौद्ध स्तूपमार्गे सांची येथून सतधारी, सोनारी, अंधेर, मुरेलखुर्द येथून उज्जैनला जातात. पुढे धमनार आणि बाघ गुंफांमध्ये भ्रमंती करून नर्मदा व तापी नदी पार करून अजंठा, अमरावतीमार्गे दक्षिणेकडे जातात. तिथून श्रीलंकेच्या दिशेने जातात. त्यादृष्टीने बौद्ध सर्किटचे महत्त्व अधोरेखित होते.

स्पॅम कॉलचा त्रास कमी होणार!
फ्रॉड कॉल आणि स्पॅम कॉलने अक्षरशः वैताग आणला आहे. कधीही आणि कोणत्याही वेळी स्पॅम कॉल येतो. त्यामुळे अनेकांना याचा मानसिक त्रास होते. तसेच यातून फसवणूक होण्याचाही धोका असतो. स्पॅम कॉल आणि मेसेजिंगवरून येणाऱया अनोळखी नंबरला ब्लॉक करता येते. स्पॅम रिपोर्ट करता येतो, परंतु अनेकदा असे कॉल्स लवकर कळत नाहीत, परंतु आता स्पॅम कॉलला आळा बसणार असून या कॉलचा त्रास संपणार आहे. ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये यासंबंधीचा करार झाला आहे. टेलिकॉम कंपन्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून स्पॅम कॉल आणि एसएमएस कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात ब्लॉकचेनसारख्या टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.

स्पॅम कॉल आणि बिनकामाचे मेसेज रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण विभाग नवीन नियम तयार करत आहे. नियमावली लागू झाल्यानंतर बँका, फिनटेक कंपन्या, रिअल इस्टेट कंपन्या आणि अन्य संस्था यांना त्यांच्या स्पॅम कॉल आणि मेसेजची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.