अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला करण्यात आली होती. त्याला आता तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यांच्या काळात रामललाच्या दर्शनासाठी देश-परदेशातून भाविकांची रीघ लागली आहे. या तीन महिन्यात आतापर्यंत सुमारे दीड कोटी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. तसेच दररोज सुमारे एक लाख भाविक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.
आता फक्त मंदिराचा तळमजला पूर्ण झाला आहे. तर पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराभोवती 14 फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. हे मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे. मंदिराची उंची अंदाजे 161 फूट आहे. पहिला आणि दुसरा मजला डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. प्रभू श्री रामाच्या मंदिरासह या परिसरात इतर 7 मंदिरेही बांधण्यात येत आहेत. महर्षी वाल्मिकी मंदिर, महर्षि वशिष्ठ मंदिर, महर्षी विश्वामित्र मंदिर, महर्षी अगस्त्य मंदिर, निषाद राज, माता शबरी, देवी अहिल्या मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.