कौटुंबिक सहल अखेरची ठरली, झिपलाईन करताना लॉक तुटला; 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक सहलीसाठी आग्र्याला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. झिपलाईन करताना लॉक तुटल्याने 45 फूट उंचीवरून पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कुणाल अग्रवाल असे मयत मुलाचे नाव आहे. आग्रा चौपाटी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फिरोजाबादचे रहिवासी असलेले अग्रवाल कुटुंब आग्रा येथे कौटुंबिक सहलीसाठी गेले होते. ताजमहल पाहिल्यानंतर कुणालने आग्रा चौपाटी येथे साहसी खेळाचा आनंद घेण्यासाठी पालकांकडे हट्ट धरला. पालकांनीही मुलाचा हट्ट पूर्ण केला आणि त्याला आग्रा चौपाटीवर झिपलाईनसाठी घेऊन गेले.

कुणाल अत्यंत उत्साहात झिपलाईनसाठी प्लॅटफॉर्मवर चढला. झिपलाईनचा प्रवास सुरू करताच अवघ्या काही सेकंदातच झिपलाईनचे लॉक लुटले आणि कुणाल खाली कोसळला. एका प्लॉटफॉर्मवर आदळून त्यानंतर कुणाल जमिनीवर कोसळला. कुणालला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

झिपलाइनचे संचालन करणाऱ्या लोकांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप कुणालचे वडील पंकज अग्रवाल यांनी केला आहे. पंकज अग्रवाल यांच्या तक्रारीच्या आधारे झिपलाईन उपक्रमाचे मालक आणि व्यवस्थापक यांच्यासह तीन व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी संतोष कुमार दुबे (58) आणि अभिषेक (27) या दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे आग्राचे पोलीस उपायुक्त सय्यद अली अब्बास यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)