
मित्राच्या घरी जाण्यासाठी गूगल मॅपची मदत घेणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. गूगल मॅपने मित्राच्या घराऐवजी दलदलीत नेले. दलदलीतून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच इंजिन अधिक गरम झाले आणि कारला आग लागली. सुदैवाने कारमधील दोघे भाऊ बचावले आहेत.
दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील रहिवासी राजन साहनी त्यांच्या भावासोबत पिहानी चुंगीजवळ मित्राला भेटण्यासाठी चालले होते. मित्राच्या घरचा पत्ता अचूक शोधण्यासाठी त्यांनी गूगल मॅपची मदत घेतली. मात्र गूगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने त्यांची कार दलदलीत जाऊन रुतली. गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना, चाके खोलवर बुडाली आणि इंजिन जास्त गरम झाले. गाडीतून धूर येऊ लागला आणि आग लागली. गाडीतून धूर निघताच एक जण बाहेर पडण्यास यशस्वी झाला तर दुसरा आतच अडकला. मात्र गाडीला आग लागण्यापूर्वीच अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

























































