चिप्सचं पाकिट चुकून गॅसवर पडलं; स्फोटात 8 वर्षाच्या मुलाचा डोळा निकामी, नेमकं काय घडलं?

लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच चिप्स खायला प्रचंड आवडतात. मात्र या चिप्समुळे एका 8 वर्षाच्या चिमुकल्यासोबत आपला डोळा गमवावा लागला आहे. ओडिशातील बालनगीर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी चिप्स उत्पादक कंपनीविरोधात तितलागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने गावातील दुकानातून चिप्सचे पाकिट आणले. मुलाची आई गॅसवर जेवण शिजत ठेवून पाणी भरण्यासाठी बाहेर गेली. याचदरम्यान मुलगा चिप्सचे पाकिट घेऊन गॅसजवळ उभा होता. चिप्स खाण्यासाठी पाकिट फोडत असताना ते हातातून निसटले आणि गॅसवर पडले. आगीच्या संपर्कात आल्याने चिप्सच्या पाकिटाचा स्फोट झाला. या स्फोटात मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

पालकांनी तात्काळ मुलाला रुग्णालयात नेले. तपासणीनंतर मुलाच्या एका डोळ्याची दृष्टी कायमची गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर चिप्स उत्पादक कंपनीविरोधात पालकांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.