
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव बचावकार्य सुरू केले आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमधील बेहटा गावात ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात आग लागून मोठे स्फोट होऊ लागले. स्फोटाचा आवाज ऐकून गावकरी घाबरून घराबाहेर पडले. स्फोटांची तीव्रता इतकी होती की दोन किलोमीटर अंतरापर्यंत आवाज ऐकू येत होता.
दुर्घटनेत कारखाना मालक आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. स्फोटामुळे आसपासच्या घरांच्या भिंतींनाही तडे गेले. बचाव पथक ढिगारा हटवत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार दबल्याची शक्यता आहे. दरम्यान घरामध्येच फटाक्यांचा कारखाना सुरू होता.