
थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री रुममध्ये कोळसा जाळणे चार तरुणांच्या जीवावर बेतले आहे. कोळसा जाळल्याने कार्बनडाय ऑक्साईडमुळे गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पंकी पोलीस स्टेशन परिसरातील तेलबिया कंपनीच्या खोलीत चार कामगारांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एका भांड्यात जळणारा कोळसा सापडला. यावरून कोळशातून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. अमित वर्मा (32), संजू सिंग (22), राहुल सिंग (23) आणि दाऊद अन्सारी (28) अशी मृतांची नावे आहेत. मयत चौघेही देवरिया जिल्ह्यातील रहिवासी होते. चौघेही एकाच कंपनीत काम करत होते.
चौघेही कंपनीच्या आवारातील एका लहान खोलीत झोपले होते. सकाळी सहकाऱ्यांनी दार उघडले तेव्हा चौघेही बेशुद्धावस्थेत आढळले. चौघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरून एका लोखंडी भांड्यात जळणारा कोळसा आढळला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विषारी वायू तयार झाला आणि यामुळे चौघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.



























































