
संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानी हवाई दलासाठी रशियाकडून पुन्हा एस-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या अतिरिक्त बॅटरी खरेदी करणार आहे. संरक्षण खरेदी परिषदेने (DAC) या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने शुक्रवारी सुमारे 2.38 लाख कोटी रुपयांच्या विविध शस्त्रे आणि विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.
डीएसीच्या बैठकीत हिंदुस्थानी हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 लांब पल्ल्यावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीच्या प्रस्तावांना, तसेच मध्यम वाहतूक विमाने, दूरस्थपणे नियंत्रित लढाऊ विमाने आणि एसयू-30 एअरइंजिनच्या भागांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
मध्यम वाहतूक विमाने भारतीय हवाई दलातील एएन-32 आणि आयएल-76 विमानांच्या ताफ्याची जागा घेतील. यामुळे हवाई दलाच्या सामरिक, रणनितिक आणि ऑपरेशनल एअरलिफ्टच्या गरजा पूर्ण होतील. रिमोटली पायलटेड विमाने समन्वित हवाई कारवाया आणि आक्रमक प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवतील. ही विमाने गुप्त माहिती, देखरेख आणि टेहळणी कार्यांनाही महत्त्वपूर्ण पाठिंबा देतील.
हिंदुस्थानी हवाई दलाव्यतिरिक्त या बैठकीत हिंदुस्थानी लष्कराच्या गरजेनुसार अनेक शस्त्रांच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली. या बैठकीत लष्करासाठी एअर डिफेन्स ट्रॅक्ड सिस्टीम, आर्मर पियसिंग रणगाडा दारुगोळा, उच्च-क्षमता रेडिओ रिले, धनुष गन सिस्टीम आणि रनवे इंडिपेंडेंट एरियल सर्व्हिलन्स सिस्टीम यांना मंजुरी देण्यात आली.
एअर डिफेन्स ट्रॅक्ड सिस्टीम लष्कराला रिअल-टाइम हवाई संरक्षण नियंत्रण आणि रिपोर्टिंग क्षमता प्रदान करेल. धनुष गन प्रणालीमुळे लष्कराच्या तोफखान्याच्या क्षमतेत वाढ हेईल. यामुळे लष्कराला सर्व प्रकारच्या भूप्रदेशात लांब पल्ल्यावर अचूक लक्ष्यभेद करणे शक्य होईल.
याव्यतिरिक्त, तटरक्षक दलासाठी हेवी ड्यूटी एयर कुशन व्हीकल्स खरेदीलाही डीएसीने मंजुरी दिली. या वाहनांचा उपयोग बहुउद्देशीय सागरी मोहिमांसाठी केला जाईल, ज्यामध्ये हाय स्पीड तटीय गस्त, टेहळणी, शोध आणि बचाव कार्य, जहाजांना मदत आणि कर्मचारी व सामग्रीची वाहतूक यांचा समावेश आहे.



























































