उरल्या 15 वर्षांच्या आठवणी… पेंचची ‘लंगडी’ वाघीण काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांमध्ये विशेष ओळख निर्माण केलेली ‘लंगडी’ म्हणून प्रसिद्ध वाघीण शनिवारी वृद्धापकाळाने मरण पावली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएन-20 (टी-20) अशी ओळख असलेली ही वाघीण सुमारे 18 वर्षांची होती आणि अभयारण्यात दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या वाघिणींमध्ये तिचा समावेश होत होता.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पुनीत गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी करमाझिरी कोअर परिसरात वाघिणीचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक पाहणीत वृद्धापकाळामुळे तिचा मृत्यू झाल्याचे दिसून आले असून नियमानुसार शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली.

2008 साली जन्मलेल्या या वाघिणीच्या पुढच्या पंज्यात विकृती होती. त्यामुळे चालताना ती किंचित लंगडत असे. यामुळे पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये ती ‘लंगडी’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. शारीरिक मर्यादा असूनही तिने अनेक वर्षे आपल्या अधिवासात यशस्वीपणे वास्तव्य केले आणि करमाझिरी परिसरात दीर्घकाळ तिचा वावर होता.

‘कॉलरवाली’शी नाते

पेंचमधील प्रसिद्ध अशा ‘कॉलरवाली’ वाघिणीशी लंगडी वाघिणीचे नाते होते. दोघी सख्ख्या बहिणी होत्या. ‘कॉलरवाली’ने आपल्या आयुष्यात अनेक वेळा पिल्लांना जन्म देत पेंचमधील वाघसंख्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दीड दशकाचा वावर संपला

वनाधिकाऱ्यांच्या मते, ‘लंगडी’ने आपल्या आयुष्यात अनेक पिल्लांना जन्म दिला आणि पेंचमधील वाघांच्या पुढील पिढीमध्ये तिचा वाटा आहे. वयोमानानुसार तिचा वावर मागील काही वर्षांत कमी झाला होता. सुमारे दीड दशकाहून अधिक काळ पेंचच्या जंगलात राहिलेल्या या वाघिणीच्या मृत्यूमुळे वनाधिकारी आणि वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.