
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाप्रकरणी एनआयने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. एनआयएने दहशतवादी उमर उन नबीचा प्रमुख सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली आहे.
जसीर हा काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी आहे. स्फोटाच्या कटात जसीरने सक्रिय भूमिका बजावली होती, असे तपासाता निष्पन्न झाले. एनआयएच्या तपासानुसार, जसीरने दहशतवाद्यांना तांत्रिक मदत पुरवली. तो ड्रोनमध्ये बदल करून त्यांना हल्ल्यांसाठी उपयुक्त बनवण्याचा प्रयत्न करत होता. याशिवाय रॉकेटसारखे तंत्रज्ञान विकसित करण्यातही तो सहभागी होता.
जसीर हा स्फोटातील आरोपी दहशतवादी उमर उन नबी याचा निकटवर्तीय असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले. एकत्रितपणे ते कार बॉम्ब हल्ल्याची योजना आखत होते. दिल्लीतील हल्ल्यात जसीरची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जसीरच्या अटकेमुळे तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे. दहशतवादी मॉड्यूलच्या तांत्रिक बाबी आणि नेटवर्कच्या प्रत्यक्ष कार्यपद्धती उघड झाले आहे.

























































