
हरियाणातील गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन भिंत कोसळून सात कामगारांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. गुरुग्रामच्या सिद्धरावली परिसरातील सिग्नेचर ग्लोबल सोसायटीमध्ये ही घटना घडली. जखमींवर भिवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हे कामगार एका सांडपाणी प्रक्रिया केंद्रात काम करत होते. यादरम्यान अचानक भिंत कोसळली आणि ते ढिगाऱ्यात आणि चिखलात अडकले. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने इतर कामगारांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे सात जणांना मृत घोषित केले. पोलिसांनी सातही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. चौघा गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.



























































