दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान 6 जण नदीत बुडाले, दोघांचा मृत्यू; एक जण बचावला, तिघांचा शोध सुरू

दसऱ्याच्या सणाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. दुर्गा मूर्ती विसर्जन करत असताना सहा जण नदीत बुडाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता तिघांचा शोध सुरू आहे. वाचवण्यात आलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील खेरागड परिसरात गुरुवारी दुर्गा देवी मूर्ती विसर्जनादरम्यान हा अपघात घडला. मूर्ती विसर्जनासाठी भाविक उंटगन नदीवर गेले होते. यावेळी काही तरुण मूर्ती विसर्जनासाठी नदीत उतरले. अचानक तोल गेल्याने सहा जण नदीत बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यास यश आले आहे. बेपत्ता तिघांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावर दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.