
ग्रामीण बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. छापेमारीत अभियंत्याच्या घरातून 40 लाख रुपयांच्या रोकडसह महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक छापा टाकण्यासाठी येताच अभियंत्याच्या पत्नीने 20 लाखांची रोकड जाळली. छापेमारी करणाऱ्या पथकाने जळालेल्या नोटा हस्तगत केल्या आहेत.
घरातील शौचालय, पाण्याची टाकी आणि स्वयंपाकघरातील कचरा बाहेर काढण्यासाठीच्या पाईपमध्ये रोकड लपवण्यात आली होती. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पटनातील मधुबनी येथील ग्रामीण बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता म्हणून तैनात विनोद कुमार राय यांच्या निवासस्थानी छापा टाकला. छापेमारीत 40 लाख रोख, सुमारे वीस लाख रुपयांच्या अर्ध्या जळालेल्या 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय, पथकाने कोट्यवधी रुपयांचे जमिनीचे कागदपत्रे, लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने आणि डझनभर महागडी घड्याळे देखील जप्त केली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक छापा टाकण्यासाठी गेले तेव्हा अभियंत्याच्या पत्नीने पथकाला तासन्तास घराबाहेर रोखले. यामुळे छापेमारीसाठी गेलेले पथक विनोद कुमार राय यांच्या घराबाहेर रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत गेट उघडण्याची वाट पाहत होते. या दरम्यान अभियंत्याच्या पत्नीने संधी साधत बाथरूममध्ये 500 रुपयांच्या नोटा जाळल्या आणि राख शौचालयात फ्लश करत राहिली.
उर्वरित 40 लाख रुपयांच्या नोटा पॉलिथिनमध्ये टाकून छतावरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक घरात प्रवेश करताच अवाक् झाले. नगर निगम टीमला बोलावण्यात आले आणि शौचालयातून जळालेल्या नोटा काढण्यात आल्या. जळालेल्या नोटांची तपासणी करण्यासाठी एफएसएल टीमला बोलावण्यात आले. त्यानंतर छतावर तपासणी केली तेव्हा त्यांना पाण्याच्या टाकीत 40 लाख रुपये पॉलिथिनमध्ये बांधलेले आढळले. सखोल चौकशी केली असता, जमिनीची आणि बँकेच्या ठेवीची अनेक कागदपत्रे सापडली. याशिवाय 20 लाख रुपयांचे दागिने आणि तीन नवीन आयफोनही जप्त करण्यात आले.