शाहजहापूर वैद्यकीय महाविद्यालयात विषारी वायूची गळती, रुग्णांना श्वास घेण्यास समस्या

उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात विषारी वायूची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पंडित राम प्रसाद बिस्मिल सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले आहे.

वायू गळतीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे रुग्णांची एकच पळापळ सुरू झाली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. फॉर्मेलिन वायूची गळती झाली असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

घटनेची माहिती मिळताच डीएम-एसपी, महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. अग्निशमन दलाच्या 12 हून अधिक गाड्या घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

परिस्थिती नियंत्रणात असून या गळतीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गॅस गळती कशी झाली याची चौकशी केली जाईल. दोषी लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शाहजहांपूरचे डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. तसेच डीएमने चौकशीचे आदेश दिले आहेत.