क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचालक तरुणही जखमी झाला आहे. रचित मध्यान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रयागराजच्या धूमनगंज परिसरात ही घटना घडली. आरोपी तरुण पेशाने वकील आहे. त्याचे वडील शहरात प्रसिद्ध मिठाईचे दुकान चालवतात. तर रचितचे सासरे शहरात प्रसिद्ध रुग्णालय चालवतात तर पत्नी देखील डॉक्टर आहे. रचितला क्रिकेटची आवड असून तो एल्गिन क्लब अलाहाबाद क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.

दुपारच्या सुमारास रचित आपल्या जॅग्वार कारने क्रिकेट सामन्यावरून घरी परतत होता. सामना हरल्याने तो तणावात होता. याच तणावातून त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि बाजारात खरेदीसाठी जमलेल्या नागरिकांना त्याने धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात रचितलाही दुखापत झाली असून त्याला वैद्यकीय उपचारांसाठी लखनौला पाठवण्यात आले आहे. जॅग्वार अपघातात दोन कार, तीन दुचाकी आणि एका सायकलचेही नुकसान झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.