संतापजनक! बीचवर फिरायला गेलेल्या मित्राला झाडाला बांधत मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार

मित्रासोबत समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या तरुणीवर त्याच्यासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गजबजलेल्या पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ओडिशातील पुरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळी ही घटना घडली. एक जोडपं समुद्रकिनारी फिरायला गेलं होतं. यावेळी काही स्थानिक तरुणांनी दोघांचे फोटो काढले आणि दोघांना ब्लॅकमेल करू लागले. यावरून जोडपं आणि तरुणांमध्ये वाद झाला. यानंतर तरुणांनी तरुणाला झाडाला बांधले आणि त्याच्यासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेने पोलीस ठाणे गाठत याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.