अमेरिकेने टेन्शन वाढवले असताना डोवाल आणि पुतीन यांचे ’शेकहँड’; हिंदुस्थान-रशियाची क्रेमलिनमध्ये खलबते

अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लादून टेन्शन वाढवल्यानंतर हिंदुस्थान सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. रशियन सरकारने या भेटीचे व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध केले.

‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे. हिंदुस्थानवर आधी त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र रशियाशी व्यापार करत असल्याची शिक्षा म्हणून आणखी 25 टक्के टॅरिफची घोषणा केली. हा आकडा आता 50 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे हिंदुस्थानी उद्योगजगतात चिंतेचे वातावरण आहे. सरकारने अमेरिकेला उत्तर द्यावे अशी मागणी विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या पुतीन भेटीकडे पाहिले जात आहे.

डोवाल हे गुरुवारी रशियाला पोहोचले. त्यांनी रशियन सरकारसोबत संरक्षणासह विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा केली. डोवाल यांनी पुतीन यांचीही भेट घेतली. त्यांच्याशी चर्चाही केली. चर्चेचा तपशील समोर आलेला नाही, मात्र अमेरिकेच्या टॅरिफ टेररचा सामना कसा करता येईल याची रणनीती बैठकीत ठरली असावी, अशी दाट शक्यता आहे.

पुतीन हिंदुस्थान दौऱयावर येणार

व्लादिमीर पुतीन हे लवकरच हिंदुस्थानला भेट देणार आहेत. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत त्यांचा दौरा होईल. त्यांच्या दौऱयाचे वेळापत्रक जवळपास ठरले आहे, अशी माहिती अजित डोवाल यांनी दिली आहे. पुतीन यांचा हा दौरा हिंदुस्थान व रशियाचे संबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल, असे मानले जात आहे.