शरीरातील उर्जा वाढीसाठी ही आहेत नैसर्गिक पेय, आता झटदिशी तुम्ही व्हाल ताजेतवाने

शरीरातील ऊर्जा संपल्यासारखे आपल्याला अनेकदा वाटते. अशावेळी नेमके काय करावे कळत नाही. उर्जी कमी झाल्यानंतर, शरीराला ताजेतवाने करण्यासाठी कोणत्याही रासायनिक पेयांपेक्षा नैसर्गिक पेय सर्वात उत्तम. शरीरातील उर्जा वाढवतील चला जाणून घेऊया अशा काही नैसर्गिक ड्रींक्सबद्दल.

तुळस आणि आल्याचं पाणी

तुळस आणि आले थकवा, मानसिक ताण आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. हा हर्बल चहा तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतो आणि नैसर्गिक ऊर्जा मिळते. एक कप पाण्यात 4-5 तुळशीची पाने आणि एक इंच किसलेले आलं घालून उकळवून घ्या.  पाणी चांगले अर्ध्यापर्यंत आटवून नंतर गाळून  घ्या आणि त्यामध्ये थोडे मध घाला. हे पेय विशेषतः दुपारची झोप आणि आळस दूर करते.

लिंबू आणि मधाचे पाणी

सकाळी लवकर लिंबू आणि मधाचे पाणी पिल्याने शरीरातील चयापचय गतिमान होते. यामुळे दिवसभर ऊर्जावान राहता. हे पेय शरीराला डिटॉक्स करते आणि थकवा दूर करते. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घाला. चांगले मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही थोडे मीठ देखील घालू शकता. यामुळे केवळ ताजेपणाच मिळणार नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल.

खजूर मिल्कशेक 

खजुरात लोह, फायबर आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते आणि दुधात मिसळल्यास हे पेय ऊर्जा वाढवते. दिवसभर काम करणाऱ्यांसाठी हे खास आहे. 4-5 खजूर गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवा, नंतर  दुधासोबत मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करुन घ्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात थोडी दालचिनी पावडर घालू शकता.

नारळ आणि लिंबाचं पाणी 

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे असतात जी शरीराला हायड्रेट ठेवतात, तर लिंबू ताजेपणा आणि व्हिटॅमिन सीचा एक आभास देतात. एका ग्लास नारळाच्या पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि चवीनुसार काळे मीठ घाला. हे पेय थंडगार प्यायल्याने शरीराचा थकवा कमी होतो आणि उन्हाळ्यात उष्माघातापासून देखील संरक्षण होते.