
नाटय़परिषदेचा अध्यक्ष कोण, या वादात रोज नवनाटय़ रंगताना दिसत आहे. नुकताच नियामक मंडळाच्या 37 सदस्यांनी बहुमताने तात्पुरता कार्यभार नरेश गडेकर यांच्याकडे दिलेला आहे, तर प्रसाद कांबळी यांनी घटनेनुसार आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. अशातच नरेश गडेकर हे कार्यकारिणीच्या दोन बैठकांना अनुपस्थित नव्हते, त्यामुळे घटनेनुसार त्यांचे कार्यकारिणी सदस्यत्व रद्द झालेले आहे, असे पत्र प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी पाठवले आहे. त्यावर नियामक मंडळाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा कांबळी यांचा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.
हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर नाटय़परिषदेचा कार्यभार हाती घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी ते काल नाटय़परिषदेच्या कार्यालयात जाणार होते, तसे पत्र त्यांनी प्रमुख कार्यवाह यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला उत्तर देताना शरद पोंक्षे यांनी गडेकराचे 18 फेब्रुवारीच्या विशेष सभेतील अध्यक्षपदच घटनाबाह्य ठरवलंय. ‘23 डिसेंबर 2020 व 13 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस अनुपस्थित राहिल्याने गडेकरांचे कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व 14 जानेवारी 2021 रोजीच संपुष्टात आले होते. त्यामुळे ते उपाध्यक्ष पद (उपक्रम) भूषवण्यास पात्र नव्हते,’ असा दावा पोंक्षे यांनी केला आहे. हे पत्र प्रवक्ते मंगेश कदम यांनी पत्रकारांमध्ये शेअर केले.
हा तर खोडसाळपणा
गडेकर यांचे कार्यकारिणी सदस्यत्व रद्द करण्याची खेळी म्हणजे प्रसाद कांबळी यांचा खोडसाळपणा आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीला पंटाळून नियामक मंडळ सदस्यांनी त्यांना हटवले, अशी प्रतिक्रिया गडेकर गटाचे प्रवक्ते भाऊसाहेब भोईर यांनी दिली. परिषदेच्या एपूण नियामक सदस्यांपैकी 40 जण त्यांच्या कामावर नाराज असतील तर त्यांनी सामोपचाराने हा प्रश्न कसा सोडवला जाईल हे पाहायला हवं होतं. पण तसे न करता सदस्यत्व रद्द असल्याचे पत्र पाठवणे चूक आहे. घटनेनुसार सदस्यत्व रद्द करायचं असेल तर तो विषय कार्यकारिणी सदस्यांपुढे यावा लागतो. त्यानंतर तो नियामकमध्ये येतो. तसं काहीही झालेले नाही, असा दावा भोईर यांनी केला. तसेच नियामक मंडळाने कांबळी यांच्याविरोधात केलेला ठराव धर्मादाय आयुक्तांना पाठवल्याचे भोईर यांनी सांगितले.


























































